हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sukh Kalale) महाराष्ट्राची लाडकी वाहिनी ‘कलर्स मराठी’ आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करते आहे. या नव्या वर्षात नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे केल्यानंतर आता ‘सुख कळले’ ही नवी मालिका लवकरच सुरु होतेय. आपल्या सुखी संसाराची स्वप्नं पूर्ण करायला वेगवेगळ्या कसोट्यांमधून तावून सुलाखून जाणाऱ्या जोडप्याची ही कथा आहे. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून जाताना एकमेकांवरचा विश्वास, प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढणाऱ्या माधव- मिथिलाची गोष्ट म्हणजे ‘सुख कळले!’
कधी सुरु होतेय माधव- मिथिलाची गोष्ट? (Sukh Kalale)
सुख नेहमी हक्क, अधिकार मिळवण्यातच असतं, असं नाही तर ते त्यागातही असू शकतं. स्वतःला जिंकताना बघण्यात सुख असतंच पण कधीकधी दुसऱ्याला जिंकवण्यात आणि जिंकलेलं पाहण्यातही सुख असू शकतं. माधव- मिथिलाचं सुख कशात आहे?
हे सांगणारी त्यांच्या निखळ, निःस्वार्थी प्रेमाची कथा ‘सुख कळले’ येत्या २२ एप्रिल २०२४ पासून कलर्स मराठीवर दाखल होतेय. सध्या या मालिकेचे प्रोमो रसिकांच्या भेटीला आले असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. सध्या ही मालिका येण्याआधीच प्रेक्षकांना भावतेय असे दिसत आहे. पडद्यावर येण्याआधीच ही मालिका प्रेक्षकांना आपलेसे करू लागली आहे.
कर्णमधुर शीर्षक
या नव्या मालिकेचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘दु:खही आपुले दरवळले, सावलीत ऊन वितळले, फिरुनी तुझ्यात बघता स्वतःस वाटले…’सुख कळले‘’ असे काहीसे याचे बोल आहेत.
हे शीर्षक गीत अश्विनी शेंडे यांनी शब्दबद्ध केले आहेत. ज्याला निलेश मोहरीर यांच्या संगीताची जोड लाभली आहे. तर प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे आणि गायक अभय जोधपुरकर यांचे स्वर लाभल्याने हे शीर्षक गीत कर्णमधुर ठरते आहे.
सागर देशमुख आणि स्पृहा जोशीची जोडी वेधतेय लक्ष
‘सुख कळले’ (Sukh Kalale) या मालिकेत माधव आणि मिथिला ही मुख्य पात्र आहे. ज्यांच्या भूमिकेत रसिकांना भेटायला सागर देशमुख आणि स्पृहा जोशी येत आहेत. प्रोमोमध्ये त्यांच्या फ्रेश जोडीची कमाल केमिस्ट्री पाहून सगळेच आनंदी झाले आहेत. या कसदार कलावंतांना पडद्यावर एकत्र पाहणं एकप्रकारचं सुखच असणार आहे, अशी प्रेक्षकांची प्रतिक्रिया मिळतेय.
मालिकेत दिसणार ‘हे’ कलाकार
स्पृहा आणि सागरच्या ‘सुख कळले’ (Sukh Kalale) या नव्या मालिकेत त्यांच्यासोबत आणखी काही दमदार कलाकार आपल्या भेटीस येणार आहेत. यामध्ये अर्नवी खडसे, सुनील गोडबोले, स्वप्निल परजणे, अनिरुद्ध जोशी, स्वाती देवल, आरती वडगबाळकर, शशांक दर्णे, स्वराध्य देवल आणि स्वाती बोवलेकरसह या कलाकार मंडळींचा समावेश आहे.
प्रत्येक घराला आणि घरातल्या प्रत्येकाला आपली वाटणाऱ्या या मालिकेची कथा कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड आणि नाटक, मालिका, चित्रपट क्षेत्राचे आजचे आघाडीचे लेखक – दिग्दर्शक केदार शिंदे यांची आहे. तर (Sukh Kalale) मालिकेची निर्मिती सोहम प्रॅाडक्शन्स यांनी केली आहे. सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर या मालिकेचे निर्माते आहेत.