नवी दिल्ली, प्रतिनिधी । यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. त्यामुळे आता 04 ऑक्टोबर 2020 रोजी नियोजित असलेली परीक्षा होणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यावर कोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. सुनावणीच्या वेळी मांडलेल्या “उमेदवाराला परीक्षेच्या जादा प्रयत्नाच्या पर्यायावर विचार करावा” ह्या मुद्यावर कोर्टाने याबाबत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाला विचार करण्यास सांगू असे म्हंटले आहे.
वसीरेड्डी गोवर्धन साई प्रकाश व इतर उमेदवार यांच्या वतीने वकील अलख आलोक श्रीवास्तव यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. कोरोना विषाणू संसर्ग सध्या जोर धरत असल्याने नागरी सेवा परीक्षा दोन ते तीन महिने पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती. याचिकाकर्त्यांनी देशात अनेक भागात संततधार पाऊस असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत असल्याचेही नमूद केले होते.
न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर, बी.आर. गवई आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठासमोर सादर सुनावणी पार पडली. कोविड -19 साठी आयोगाने यापूर्वीच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार वयाची 21 वर्षे पूर्ण केलेले परीक्षार्थी नक्कीच योग्य काळजी घेतील. त्यामुळे आता केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा ही नियोजित प्रमाणेच होईल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.