हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेवर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.”हिंगणघाटमध्ये या तरुणीला आरोपीनं जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात पीडितेचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुर्देवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी असून अशा घटना राज्यात होणं हे अतिशय दु:खद आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला गेला आहे. आरोपीला शिक्षा व्हावी. कारण तातडीनं न्याय मिळतो, हा संदेश जायला हवा,” असं सुळे यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विटवर याबाबत प्रतिक्रिया देतांना त्या म्हणाल्या,”अतिशय दुःखद..! हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होतेय. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलावी ही विनंती. या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत,” असं सुळे यांनी म्हटलं आहे.
अतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यु झाला.या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय.पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती.या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली.तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
— Supriya Sule (@supriya_sule) February 10, 2020
हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती, ती अपयशी ठरली. या घटनेनंतर सर्वत्र शोककळा व्यक्त केली जात आहे. पीडितेच्या मृत्युनंतर तिच्या वडिलांना दुःख अनावर झालं. “मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा. ज्या वेदना माझ्या मुलीला झाल्या. त्याच वेदना आरोपीला झाल्या पाहिजे. निर्भयावर अत्याचार करणाऱ्यांसारख नको, तर लवकरात लवकर न्याय हवा,” अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.