हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या एका पोस्टने खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक झाला असून कोणीही आपल्याला कॉल मेसेज करू नका असं त्यांनी म्हंटल आहे. यानंतर सुप्रिया सुळे यांनी कायदेशीर पोलीस तक्रारही केली आहे. पक्ष नेला, चिन्ह नेलं आणि अजून काय काय नेतील याची गॅरंटी नाही. माझ्याकडून ते सर्व घेऊन जाऊ शकतात, फक्त माझे माय-बाप मतदार घेऊन जाऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. सुप्रिया सुळे यांच्यासारख्या बड्या नेत्याचा मोबाईल हॅक झाल्याने चर्चाना उधाण आलं आहे.
काय आहे सुप्रिया सुळेंचं ट्विट?
सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट करत म्हंटल, *** अत्यंत महत्वाचे *** ‘माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी. एकप्रकारे कार्यकर्त्यांना त्यांनी सावध राहण्यास सांगितलं आहे. या ट्विटनंतर सुप्रिया सुळे या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झाल्या. त्यावेळी दौंड येथील भाषणात त्यांनी मोबाईल हॅकिंग बाबत सविस्तर घटनाक्रम सांगितला.
*** अत्यंत महत्वाचे ***
— Supriya Sule (@supriya_sule) August 11, 2024
माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी. – सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझा फोन हॅक झाला असून माझ्यासोबत इतर कोणीतरी ऑपरेट करत आहे. इथे आल्यानंतर माझ्या हे लक्षात आले. माझं व्हॉट्सअॅपच सुरु होत नव्हतं. मी जयंत पाटील यांनी मला नमस्कार मेसेज करा असे सांगितले. त्यांनी तो मेसेज केल्यानंतर मी फोनवर काहीही न करता त्यांना ऑटोमॅटिक समोरुन नमस्कार असा मेसेज आला. यानंतर मी माझा फोन बंद केला. मी पुन्हा दोन, तीन जणांना माझ्या फोनवर मेसेज करण्यास सांगितले. त्यांनाही समोरुन मेसेज आला. माझा फोन बंद आहे. मी सिमकार्ड काढलं आहे. पण तरीही जे कोणी मला मेसेज करतात, त्यांच्याशी कोण गप्पा मारतंय, हे मला माहिती नाही. माझा फोन कोणी हॅक केला याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. खरं तर त्यात लपवण्यासारखे काहीही नाही. पण फक्त माझ्या नवऱ्याला काही चुकीचे मेसेज पाठवू नका, एवढीच त्या हॅकरला विनंती आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटल आहे.