हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बीड जिल्ह्यात गाजत असलेल्या खोक्या उर्फ सतीश भोसले(Satish Bhosale) प्रकरणात अखेर आज मोठी कारवाई झाली आहे. भाजप आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असणार खोक्या भोसले याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सुरेश धस यांची प्रतिक्रिया
माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले की , “ही अत्यंत चांगली बाब आहे. त्याने जर काही चुकीचे केले असेल, तर कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल. मी कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला या प्रकरणात फोन केलेला नाही, आणि करणारही नाही. कायदा त्याचे काम करेल.”
यानंतर काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत म्हणले आहे की, “खोक्याचा बोक्याही सापडला पाहिजे,” त्यावर प्रत्युत्तर देताना आमदार सुरेश धस म्हणाले की, “फक्त खोक्या नाही, तर बोका, आका, सर्वच पोलिसांनी शोधून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. मात्र, खोक्याचा ‘आका’ कोण आहे याबाबत मला कोणतीही माहिती नाही.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी आमदार सुरेश धस यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. यावर संतप्त प्रतिक्रिया देताना धस म्हणाले की, “कोणालाही सहआरोपी ठरवता येतं का? हा काय भाजीपाला आहे का? अजय मुंडे अजून लहान आहे, त्यामुळे त्याच्याकडे फारसं लक्ष द्यायचं कारण नाही. पण जर धनंजय मुंडेंनी स्वतः पुढे येऊन बोलायचं असेल, तर मी त्यांना उत्तर द्यायला तयार आहे.”
दरम्यान, खोक्या भोसलेच्या अटकेनंतर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी संबंधित काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. यावर भाष्य करताना सुरेश धस म्हणाले आहेत की, “धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद गेल्यानंतरच हे सर्व व्हिडिओ बाहेर येऊ लागले. जर त्यांना काही बोलायचं असेल, तर त्यांनी स्वतः समोर येऊन बोलावं. मी तयार आहे”