कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी,
घारेवाडी येथील एका नवरदेवाने चक्क वाजत- गाजत आपल्या लग्नाच्या आगोदर मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे नवरदेवाने अशा पध्दतीने आपला मतदानाचा हक्क बजावल्याने परिसरात चर्चेचा विषय बनलेला होता. तसेच शासनाच्या जनजागृती कार्यक्रमांस चांगला प्रतिसाद दिला पाहिजे, असे मत देखील नवरदेवाने व्यक्त केले.
कराड- ढेबेवाडी मार्गावर घारेवाडी येथील महेश विश्वनाथ घारे यांचा आज (दि.२३) विवाह होणार होता. सकाळी लग्नस्थळावर सकाळी ११ वाजता साखरपुडा आणि सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी लग्न होते. त्यामुळे महेश घारे यांनी सकाळी घरातून घोड्यावर बसून वाजत – गाजत गावदेव केला, नंतर लग्नाच्या ठिकाणी न जाता थेट घारेवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक १७ वरील जिल्हा परिषद शाळा क्रमांक जावून आपला मतदानाचा हक्क बजावला. नवरदेवासोबत त्याच्या मित्रांनीही मतदानाचा हक्क बजावला. नवरदेवांने गावदेवसाठी पोशाख परिधान केला होता, तसेच घोडाही सजवला होता.
नवरदेव या पोशाखात मतदान करण्यासाठी आल्याने परिसरातील लोकांच्यात चर्चेचा विषय बनला होता. महेश घारे यांचा विवाह हा वाघोली (ता. पाटण) येथील सुरेश विष्णू निकम यांची कन्या प्रियांका हिच्याशी कोळे येथील मंगल कार्यालयात होणार आहे. तसेच प्रत्येकाने वेळ काढून मतदान केले पाहिजे, असे आवाहन नवरदेव असणाऱ्या महेशने यावेळी केले.