औरंगाबाद | शहरातील मिटमिटा येथे महापालिकेतर्फे प्राणिसंग्रहालयाचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्राणिसंग्रहालयाच्या काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर यासाठी अतिरिक्त जागेचा तसेच निधीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी लवकरात लवकर पाठवावा असे निर्देश देखील दिले होते. त्यानुसार गुरुवारी अतिरिक्त 58 हेक्टर जमीन मिळवण्यासाठी भूमापन अधिकाऱ्याने जमिनीची मोजणी केली आहे. महापालिका हद्दीतील मराठवाड्यातील एकमेव प्राणीसंग्रहालय असलेले 14 एकर जागेवरील सिद्धार्थ उद्यानात प्राण्यांसाठी जागा कमी पडत असल्यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने तातडीने प्राणिसंग्रहालयाची मान्यताच रद्द केली.
यामुळे मनपाने मिटमिटा येथे सफारी पार्क उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी तात्काळ मिटमिटा येथील गट नंबर 307 मधील 70 हेक्टर शंभर एकर जागा मनपाला दिली. या माध्यमातून सपाटीकरण व संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू केले. त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा त्यांचे निवासस्थान पर्यटकांना पाहताना करण्यासाठी लागणारी जागा याचा विचार करत करत असता अतिरिक्त जागेसाठी जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव दिला आहे.
दरम्यान, आमदार प्रदीप जयस्वाल यांनी सफारी पार्कसाठी 50 मीटर जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली होती. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी वरील आदेश दिले होते. यावेळी आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल महसूल विभागाचे अधिकारी तसेच औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांची उपस्थिती होती.