हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नांदेड मतदारसंघामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण की, भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) नेते जयंत पाटील आणि इतर मंडळी देखील उपस्थित होते. सूर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटातील पक्षप्रवेश भाजप साठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण गेल्या १० वर्षांपासून सूर्यकांता पाटील भाजपसोबत काम करत होत्या. मात्र आता त्यांनी भाजपची साथ सोडली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच सूर्यकांता पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांच्याकडे भाजपच्या प्रथम सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यावेळी त्यांनी, “माझ्या मनात कोणती कटूता नाही. मी भारतीय जनता पार्टीची आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे” असे म्हणले होते. दरम्यान, गेल्या दहा वर्षांपूर्वी सूर्यकांता यांनी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांनी तब्बल दहा वर्षे भाजप सोबत राहून हिंगोली नांदेड मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलं.
खरे तर, देशामध्ये भाजपची सत्ता आल्यामुळे सूर्यकांता यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला होता. परंतु भाजपातील प्रवेशानंतर भाजपने त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी दिली नाही. तसेच कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात त्यांना सहभागी करून घेतले नाही. त्यामुळेच आता सूर्यकांता यांनी भाजपशी साथ सोडली आहे. तर पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे पक्ष प्रवेश केला आहे.