हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणूक संपताच माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. ज्यामुळे नांदेडमधून भाजपला मोठा धक्का बसला आहे. आता सूर्यकांता यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश करतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अद्याप याबाबत सूर्यकांता यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र असे झाल्यास भाजपला यांना जोरदार फटका बसू शकतो.
शनिवारी सूर्यकांता पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांच्याकडे भाजपच्या प्रथम सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी, “माझ्या मनात कोणती कटूता नाही. मी भारतीय जनता पार्टीची आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे” असे म्हणत भाजपसोबतचा मागील दहा वर्षांचा प्रवास थांबवला. सूर्यकांता पाटील यांनी हा राजीनामा दिल्यामुळे सर्वांनाच त्याचा धक्का बसला. कारण, गेल्या दहा वर्षांपूर्वी सूर्यकांता यांनी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश केला होता.
भाजपमध्ये आल्यानंतर सूर्यकांता यांची केंद्रीय मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली. तब्बल दहा वर्षात त्यांनी भाजपा सोबत राहून हिंगोली नांदेड मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलं. परंतु आता भाजप सोडल्यानंतर पुन्हा सूर्यकांता शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. आज सूर्यकांता या मुंबईमध्ये शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा पक्षप्रवेश नेमका कधी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले.
दरम्यान, सूर्यकांता पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत देखील अनेक वर्ष काम केले आहे. म्हणूनच त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून शरद पवार यांनी केंद्रीय ग्रामविकास राज्य मंत्रिपदी सूर्यकांता पाटील यांना संधी दिली होती. पुढे, भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी भाजपशी हात मिळवणी केली. परंतु भाजपातील प्रवेशानंतर भाजपने त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी दिली नाही. तसेच कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात त्यांना सहभागी करून घेतले नाही. त्यामुळेच आता सूर्यकांता यांनी भाजपशी साथ सोडली आहे.