Tuesday, January 7, 2025

Suryakumar Yadav Birthday : हैप्पी बर्थडे सूर्याभाऊ… भारताच्या ‘मिस्टर 360’ च 34 व्या वर्षात पदार्पण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सूर्यकुमार यादव… बस नाम हि काफी है!! कोणत्याही चेंडूला आपल्या खास शैलीत मैदानाच्या कोणत्याही भागात भिरकावण्याची क्षमता असलेला, पहिल्या चेंडूपासून प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्ला करून त्यांना सळो कि पळो कडून सोडणारा आपला सूर्याभाऊ… एवढच नव्हे तर नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात डेव्हिड मिलरचा ऐतिहासिक कॅच पकडून संपूर्ण देशवासीयांच्या गळ्यातील ताईत बनलेला आपला सूर्याभाऊ… याच सूर्याने आज वयाच्या ३४ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. खरं तर वयाच्या ३१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पणची संधी मिळालेल्या सूर्यकुमारने अवघ्या ३ वर्षातच थेट भारताचे T20 कर्णधारपद मिळवलं ते आपल्या याच कष्टाच्या जोरावर… भारताच्या या ‘मिस्टर 360’ च्या वाढदिवशी (Suryakumar Yadav Birthday) जाणून घेऊया त्याच्याबद्दल सर्वकाही…..

सूर्यकुमार यादवचा जन्म 14 सप्टेंबर 1990 रोजी मुंबईत झाला. मात्र, तो मूळचा गाझीपूर, उत्तर प्रदेशचा आहे. सूर्याने 2010 मध्ये मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याने दिल्लीविरुद्ध 89 चेंडूत 73 धावांची खेळी केली होती. अनेक वर्ष मुंबईकडून क्रिकेट खेळलेला सूर्यकुमार खरा गाजला तो आयपीएल मध्ये…. मुंबईचा तत्कालीन कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादव मधील टॅलेंट ओळखून त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि भारताला नवा सूर्य मिळाला…. २०२० च्या आयपीएल मध्ये मुंबईकडून खेळताना सूर्यकुमारने 16 सामन्यात 480 धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला टीम इंडियात स्थान मिळाले. भारतीय संघातही त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जीवावर अनेक अश्यक्यप्राय विजय संघाला मिळवून दिले.

सूर्याकडे वेगवेगळ्या शॉटचा खजिना- (Suryakumar Yadav Birthday)

आडवे-तिडवे, गुडघे टेकून कधीही न बघितलेले शॉट सूर्यकुमार खूपच आरामात मारायचा…. सूर्याचा फुटवर्क आणि हालचाल पाहून नेमका बॉल टाकायचा तरी कुठं असाच प्रश्न गोलंदाजांना पडतो… सूर्या खऱ्या अर्थाने बॉलर्सचा कर्दनकाळ ठरतो..फास्ट बॉलर असो वा फिरकीपटू, सूर्याच्या भात्यात इतके शॉट आहेत कि फिल्डर कुठेही उभा असाल तरी त्याला सळो कि पळो कडून सोडण्याची क्षमता सूर्यकुमार मध्ये आहे. स्वीप, रिव्हर्स स्वीप, पॅडल असे त्याचे टॉप शॉट आहेत, आपल्या मनगटाच्या जोरावर तो सहजपणे हे शॉट खेळू शकतो. मनगटाच्या मागच्या भागाच्या मदतीने मिडल स्टंप वरील बॉल सुद्धा तो फाईन लेग आणि लाँग ऑफ अशा दोन्ही ठिकाणी मारतो. त्यामुळेच त्याला भारताचा ‘मिस्टर 360’ असेही म्हंटल जाते.

सूर्यकुमारच्या एकूण कारकिर्दीबाबत बोलायचं झाल्यास, सूर्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत ३७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 773 धावा केल्या आहेत. तर 71 टी-20 सामन्यात त्याने 2432 धावा केल्या आहेत. सूर्याने आयपीएलमध्ये जवळपास 150 सामने खेळले असून 3594 धावा केल्या आहेत. बॅकफूट आणि फ्रंटफूट या दोन्हीवर तो बेस्ट आहे. बॉलचा टप्पा पाहूनच तो कोणत्या दिशेला आणि कसा खेळायचं हे टेक्निक फार कमी फलंदाजांकडे असते, त्यातीलच एक आहे आपला सूर्यकुमार यादव…. याच सूर्याभाऊला हॅलो वाढदिवसाच्या (Suryakumar Yadav Birthday) खूप शुभेच्छा…