मुंबई । अभिनेता सुशांत सिंहच्या बँक खात्यातून रिया चक्रवर्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याच्या अनेक बातम्या समाज माध्यमात फिरत होत्या. पण रियाच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर न झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात आढळून आलं असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले. परमबीर सिंह यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाविषयी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
एखादी घटना घडल्यानंतर झालेल्या पोलीस तपासात पहिला जबाब हा महत्वाचा मानला जातो. सुशांतच्या घरच्यांशी झालेल्या पहिल्या जबाबात त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता. सुशांतवर सुरु असलेले उपचार आणि व्यावसायिक दडपणामुळे आत्महत्या केली असावी असे त्यांचे म्हणणे होते. पण त्यानंतर त्याच्या वडीलांना नंतर बिहारमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर सुशांतचे कुटुंबीय जबाबासाठी आले नाहीत आणि त्यांनी थेट बिहारमध्ये तक्रार केली असं परमबीर सिह यांनी म्हटलं.
सुशांत आत्महत्येप्रकरणात आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवून घेतले असून सर्वांची सविस्तर चौकशी करण्यात आली. मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या ५६ लोकांमध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे. रियाचा जबाब दोन वेळा नोंदवला गेला. तिला पोलीस ठाण्यातही अनेकदा बोलावलं गेलं.
बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढून घेण्यात आले असं म्हटलं गेलं आहे.
मात्र, सुशांतच्या खात्यात १८ कोटी रुपये होते आणि त्यापैकी साडे ४ कोटी रुपये अजूनही खात्यात आहेत, असं आमच्या तपासात निदर्शनास आलं. सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत अजून तपास सुरू असल्याचे परमबीर सिंह यांनी यांनी सांगितलं. मुंबई पोलिसांच्या तपासत समोर आलेल्या बाबींमधून रियाच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्याच्या चर्चेलाही पुर्णविराम मिळाला आहे.
लॉकडाऊनमध्ये सुशांतच्या घरी पार्टी झाली आणि त्यात अनेक मोठी नाव असल्याची चर्चा सुरु होती. यावर देखील मुंबई पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. याबाबत आम्ही अधिक कायदेशीर माहिती घेत आहोत. १३ अणि १४ जूनचे सुशांतच्या इमारतीचे सीसीटीव्ही फूटेज तपासले गेले पण पार्टीबाबत कोणतेच पुरावे आढळले नसल्याचे सांगण्यात आले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”