मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास कुठवर आला आहे, आतापर्यंत किती आणि कोणाचे जबाब नोंदवले गेले, यांसारख्या मुद्द्यांवर मुंबई पोलीस आयुक्तांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत याविषयीची माहिती दिली. ज्या राज्यात घटना घडली असेल त्याच राज्याचे पोलीस संबंधित घटनेचा तपास करतात. त्यामुळे सुशांत आत्महत्या तपासाचा अधिकार कायद्याने मुंबई पोलिसांकडे असल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी यावेळी म्हटलं. यामुळे बिहार पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह झालायं. सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांना होम क्वारंटाईन केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या भुमिकेवर संशय निर्माण झाला. यावर मुंबई पोलिसांतर्फे आता स्पष्टीकरण देण्यात आलंय. रियाच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्याच्या चर्चेलाही पुर्णविराम मिळाला आहे.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाच्या मुंबई पोलिसांच्या तपासातून समोर आलेले १० महत्त्वाचे मुद्दे..
१. सुशांत मृत्यू प्रकरणी आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा आरोग्य अशा सर्व मुद्द्यांवरून तपास सुरू आहे.
२. सुशांत दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व (bipolar disorder) या मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्यासाठी तो उपचार घेत असल्याचं उघडकीस आलं आहे.
३. कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला हा आमच्या तपासाचा विषय आहे.
४. १६ जून रोजी सुशांतचे वडील, बहीण आणि मेहुण्याचा जबाब नोंदवला गेला.
५. त्यावेळी सुशांतच्या कुटुंबीयांनी आमच्या तपासाबद्दल कोणतीच शंका उपस्थित केली नव्हती. आमच्या तपासात काही त्रुटी असल्याची तक्रारसुद्धा त्यांनी केली नव्हती.
६. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या ५६ लोकांमध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे.
७. रियाचा जबाब दोन वेळा नोंदवला गेला. तिला पोलीस ठाण्यातही अनेकदा बोलावलं गेलं.
८. ती आता कोठे आहे, याबाबत मी वक्तव्य करू शकत नाही.
९. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढून घेण्यात आले.
१०. सुशांतच्या खात्यात १८ कोटी रुपये होते आणि त्यापैकी साडेचार कोटी रुपये अजूनही खात्यात आहेत, असं आमच्या तपासात निदर्शनास आलं. सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत अजून तपास सुरू आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”