हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मनोज जरागे पाटील यांनी सरकार विरोधात आक्रमकाची भूमिका घेतली आहे. याच मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध केल्यामुळे जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. आता या वादामध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील उडी मारली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर सुषमा अंधारे यांनी बोचरी टीका केली आहे.
जरांगे पाटीलांवर टीका करत सुषमा अंधारेंनी म्हटले आहे की, “एकीकडे मागास सांगायचं आणि जरांगे आडनावाबरोबर पाटील लावायचं. आर्थिक मागास असल्याचं बोलायचं आणि दुसरीकडे 100 जेसीबीने फुलांची उधळण करायची. आमच्याकडे काहीच नाही बोलायचं आणि सभेसाठी 150 एकर मोसंबीची बाग तोडायची” अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी जरांगे पाटलांना सुनावले आहे.
त्याचबरोबर, “मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमचीही भूमिका आहे. पण ही भूमिका घेत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मिळालं पाहिजे. अशी आमची मागणी आहे. पण हा तिढा फक्त केंद्र सरकारच सोडवू शकतं किंबहुना मराठा आरक्षण मुद्द्याची कोंडी तिथेच फुटू शकते. मराठा आरक्षणासंबंधीचा विधिमंडळाने एक ठराव पास करून केंद्र सरकारकडे पाठवावा. आणि त्यानंतर केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा” असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.