कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची महाप्रबोधन यात्रा रविवारी सातारा जिल्ह्यातील पाटण मतदार संघात असणार आहे. शिवसेनेची तोफ असलेल्या सुषमाताई अंधारे या सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदार संघात येणार आहेत. गेल्याच आठवड्यात शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना पाटण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिलं होत. तेव्हा वरळी मतदार संघातील मुख्यमंत्री व आदित्य ठाकरे यांच्यातील वाद पाटण विधानसभा मतदार संघात पोहचला. त्यामुळे आता सुषमाताई अंधारे या मुद्यावरून पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा नक्की समाचार घेतील. या महाप्रबोधन यात्रेमुळे पाटण तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना व उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्यात राजकीय वातावरण तापलेले पहायला मिळतय.
आदित्य ठाकरे यांनी मी राजीनामा देतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आव्हान स्विकारून वरळीतून निवडणूक लढवावी, असे आव्हान दिले होतं. त्यानंतर मुंबईत राजकीय वाद दोन गटात निर्माण झाला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु दुसऱ्याच दिवशी आदित्य ठाकरे यांनी पुन्हा दुसरे आव्हान दिले आहे, अन् राज्यपाल यांची हकालपट्टी करावी असे म्हटले आहे.
मुंबईत सुरू असलेला हा वाद सातारा जिल्ह्यातही पोहचला आहे. उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याऐवजी पाटण मतदार संघातून निवडणूक लढवून दाखवावी, असे चॅंलेज दिले. त्यानंतर शंभूराज देसाई यांच्या वक्तव्यावर उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांनी प्रत्युत्तर दिले असून सामान्य शिवसैनिका सोबत लढावं, असे म्हटल. त्यामुळे पाटण मतदार संघातील दोन्ही गटातील राजकीय वातावरण तापले असून रविवारी सुषमाताई अंधारे यांच्या सभेकडे आता लक्ष लागले आहे.