सोलापूर प्रतिनिधी । स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारीणी बरखास्त करण्यात आली आहे. अगदी प्रदेश पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत सगळीच कार्यकारिणी बरखास्त झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्या कार्यकारिणीची बांधणी करणार असल्याचे स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी शेट्टींनी ही माहिती दिली.
या बैठकीत स्वाभिमानीचे अनेक कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शेतकरी संघटनेची निर्मिती केली. या संघटनेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यावर त्यांनी भर दिला. पण, बदलत्या परिस्थितीत शेतकरी संघटनेतील नेत्यांच्या भूमिकेनुसार संघटनेचीही शकले झाली. कोण जोशींवरील प्रेमापोटी त्यांच्या शेतकरी संघटनेत राहिले तर काहींनी स्वत:च्या संघटना काढल्या. पण, या सर्व संघटनांचा हेतू शेतकऱ्याचे प्रश्न सोडविणे हाच होता.
सुरवातीला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सर्व संघटनांची स्वतंत्र आंदोलने झाली. शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी यासाठी सरकारला कोंडीत पकडण्याइतपत आंदोलनाची धार होती. मात्र, बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविताना सत्तेत सहभागी झाल्यास अधिक सोप्या पध्दतीने ते प्रश्न सुटतील, हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन काहींनी आपली संघटना सत्ताधारी पक्षांसोबत जोडली. आता प्रदेश पातळीपासून गाव पातळीपर्यंत सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. तसेच नवीन कार्यकारिणी लवकरच तयार करण्यात येईल अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.