हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे सांगोला तालुक्यातील हॉटेलचे बिल बुडवल्याच्या कारणावरून संबंधित हॉटेल मालकाने बिल मागितल्याचा प्रकार घडला. 2014 साली लोकसभा निवडणूकमध्ये 66 हजार 450 रुपये बिल थकल्याचा आरोप हॉटेल मालकाने केला आहे. दरम्यान, यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व भागवत जाधव यांनी प्रसंगी भीक मागून संबंधित हॉटेल मालकाचे पैसे भागवू, असे सांगितले आहे.
स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यातील एका हॉटेल व्यावसायिकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना रस्त्यावर अडवून उधारी मागितली. त्यावर महाराष्ट्रात खूप चर्चा सुरू आहे. सदाभाऊ खोत हे वाळवा तालुक्यातील आहेत. उधारीवरून आमच्या वाळवा तालुक्याची बदनामी करू नका. त्यांची हॉटेलची 66 हजार 450 रुपयांची उधारी आम्ही भीक मागून आम्ही भरणार आहोत.
यावेळी महेश खराडे यांनी सदाभाऊंना उधारीसाठी इथून पुढे कोणीही अडवून आमच्या वाळवा तालुक्याचा अपमान करू नये. सदाभाऊ पूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे होते. ज्यांच्याकडे सदाभाऊंची उधारी असेल, त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. आम्ही ती उधारी भीक मागून भरू, असे खराडे यांनी म्हटले आहे.