सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
तासगाव, नागेवाडी कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज विटा तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. दरम्यान तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी काढण्यात आलेल्या साखर लिलावातून आठ कोटी रुपये शासकीय खात्यावर जमा झाले आहेत.
उर्वरित आठ कोटी 25 एप्रिल पर्यंत जमा होतील तर 30 एप्रिलपर्यंत नागेवाडी कारखान्याची थकीत बिले जमा करण्यात येतील तर तासगाव कारखान्याची थकीत बिले 20 मे पर्यंत जमा होतील अशी माहिती तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर धडक दिली.
यावेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी महेश खराडे म्हणाले, साखरेचा लिलाव होवून एक महिना उलटून गेला तरीही अद्याप शेतकर्यांना पैसे मिळाले नाहीत ती बिले तातडीने मिळावीत साखर व्यापार्यास तातडीने पैसे भरण्यास भाग पाडून शेतकर्याच्या खात्यावर पैसे वर्ग करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.