हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Swargandharva Sudhir Phadke) ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हे मराठी घराघरांत आणि रसिक प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचलेले एक अजरामर नाव आहे. मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक ठसा उमटवला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने कानसेनांना तृप्त केले आहे. ‘गीतरामायणा’तील गोडव्याने, भावविभोर गीतांनी ‘बाबुजीं’नी मराठी मनावर राज्य केले. अशा ‘बाबुजीं’ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट येत्या १ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला आहे.
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच (Swargandharva Sudhir Phadke)
रामनवमीच्या पूर्वसंध्येला या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच या ठिकाणी चित्रपटातील टीमसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात चित्रपटातील ’गीतरामायण’मधील बहारदार गाण्यांची झलकही पाहायला मिळाली. हा चित्रपट म्हणजे आजवरचा सर्वात भव्य स्वरमयी बायोपिक ठरणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने बाबुजी आणि त्यांच्यासोबत गायलेल्या अनेक नामवंताच्या असंख्य गाजलेल्या गाण्यांना चित्रपटगृहात नव्याने अनुभवण्याची पर्वणी या कलाकृतीच्या माध्यमातून मिळणार आहे. या चित्रपटात एकूण २७ गाणी आहेत आणि त्यामुळे प्रेक्षकांना संगीत नजराणा मिळणार आहे.
तगड्या कलाकारांची फौज
(Swargandharva Sudhir Phadke) सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट योगेश देशपांडे यांनी दिग्दर्शित केला असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवादही त्यांचेच आहेत.
राज ठाकरेंकडून कौतुक
या (Swargandharva Sudhir Phadke) ट्रेलर लॉंच सोहळ्याच्या खास समयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, ‘मला बाबुजींचा सहवास फारसा लाभला नाही. परंतु माझ्या वडिलांचे आणि बाबुजींचे जवळचे संबंध होते. बाबुजींना जवळून भेटण्याचा योग आला नाही’.
‘बहुदा हा योग सुनिल बर्वेंमुळे येईल. बाबुजींची सगळीच गाणी अजरामर आहेत. त्यांच्या गाण्यांची खासियत म्हणजे एखाद्याला नवसंजीवनी देणे. उभारी देणे. मला खात्री आहे, या चित्रपटाला नक्कीच प्रेक्षकांची पसंती मिळेल’.
दिग्दर्शकाने व्यक्त केल्या भावना
दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, ‘आजचा हा दिवस खूपच आनंददायी आहे. कलाप्रेम राज ठाकरे यांच्या उपस्थितीने या सोहळ्यात अधिकच रंगत आणली. फडके आणि ठाकरे कुटुंबाचे अत्यंत निकटचे संबंध आहेत. स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे संगीत क्षेत्रातील योगदान सर्वश्रुतच आहे. (Swargandharva Sudhir Phadke) परंतु इथंवर पोहोचण्याचा त्यांचा प्रवास तसा खडतर होता. त्यांच्या या प्रवासात पत्नी ललिताबाई, ग. दि. माडगुळकर हे त्यांच्या सोबत होतेच. परंतु या प्रवासात त्यांना इतर अनेकांनी साथ दिली. त्यांच्या भावसंगीताचा हा रंजक प्रवास या चित्रपटातून मांडण्याचा आमचा प्रयत्न केला आहे’.