कोल्हापूर प्रतिनिधी । कोल्हापूर- जयसिंगपूर उपविभागीय निर्भया पथकाच्या प्रभारी महिला पोलिस उपनिरीक्षक स्वाती सूर्यवंशी यांच्यावर कर्तव्यात कसून केल्याचा ठपका ठेऊन निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सूर्यवंशी यांची २९ जानेवारीपासून पोलिस मुख्यालयात तडकाफडकी बदली केली होती.
जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, वडगाव या भागात निर्भया पथकाचे काम करणाऱ्या उपनिरीक्षक सूर्यवंशी यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. धाडसी अधिकारी म्हणून त्याचा दरारा होता. मात्र, केलेल्या कारवाईची नोंद न ठेवणे, वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष, कारवाईची माहिती लपवून ठेवणे, प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा वेळेत न करणे असा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.
कर्तव्यात कसूर ठेवल्याबद्दल गेले काही दिवस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी सुरू होती. विरोधातील तक्रारींचा ओघ वाढल्याने त्यांची पोलिस अधीक्षक कार्यालयात बदली केली होती. चौकशीचा अहवाल मिळाल्यानंतर त्यांनी कामात हयगय केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर निलंबनाची कारवाई केली, असे अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.