सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील सातारा – लातूर महामार्गावरील माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथे स्विफ्ट कार, बुलेट आणि क्रुझरचा विचित्र अपघात झाला आहे. या तिहेरी अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील तीनही मृत युवक हे माण तालुक्यातील पळशी येथील आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील घोडके वस्ती परिसरात एक दुचाकी (बुलेट) व स्विप्ट कार क्रमांक (MH05 V. 9695) या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत बुलेटवरून जात असलेले तुषार लक्ष्मण खाडे (वय 22), अजित विजयकुमार खाडे (वय 23) व महेंद्र शंकर गोड ( वय 21) यांचा जागीच मृत्यु झाला.
यावेळी स्विप्ट कारमधील चालक गणेश आनंदराव टेंबरे (वय 28) व त्यांच्या बाजुला बसलेले आनंदराव टेंबरे (वय 61) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. नागरिकांनी जखमींना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर स्विप्ट कारचे चालक गणेश यांचा पाच वर्षाचा मुलगा हा बचावला आहे. तसेच या अपघाताची माहिती पोलिसांना नागरिकांनी दिली. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
5 वर्षाचा मुलगा बचावला
यावेळी अपघातात जखमी झालेल्या आनंदराव टेंबरे यांचा नातू सुदैवाने बचावला आहे. आनंदराव टेंबरे हे ठाणे पोलीस दलातून सेवामुक्त झाले आहेत तर त्यांचा मुलगा गणेश हा गावी दिडवाघवाडी येथे आपल्या पत्नी व मुलासह राहत आहे. गणेशची पत्नी ही त्यांच्या माहेरी पिंपरी चिंचवडला असल्यामुळे हे दोघे पिता पुत्र त्यांना भेटुन गावी दिडवाघवाडीला परतत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा 5 वर्षाचा विहान हा मुलगा सुध्दा गावी निघाला होता. या भीषण अपघातात तो सुदैवाने बचावला आहे.