मेलबर्न । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, ऑस्ट्रेलियन सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत टी-२० विश्वचषकासारखी स्पर्धा आयोजित करण्याबद्दल बोर्डाच्या अनेक अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र आता ऑस्ट्रेलियातील T20 World Cup 2020 चे आयोजन करणे हे जवळपास अशक्य असल्याची कबुली क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आली आहे.
”ऑस्ट्रेलियात T20 World Cup चे आयोजन यंदाच्या वर्षात करणे हे सध्या तरी शक्य आहे असे दिसत नाही. T20 World Cup स्पर्धा अद्याप रद्द करण्यात आलेली नाही किंवा पुढेदेखील ढकलण्यात आलेली नाही. पण सध्या विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या १६ संघांपैकी अनेक देश करोनाच्या तडाख्यातून अद्यापही सावरू शकलेले नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत जगातील १६ देशांना एकत्र आणणे हे खूपच कठीण आहे. ICC सध्या तरी चर्चा झाल्याप्रमाणे बैठकीचे आयोजन करणार आहे. त्यात बऱ्याचशा गोष्टीत बदल होण्याचीही शक्यता आहे.” असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष अर्ल एडिंग्ज यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, १० जूनला ICC च्या बैठकीत टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल चर्चा झाली, पण कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे ICC ने स्पर्धेच्या आयोजनाबद्दलचा निर्णय जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलला. दरम्यानच्या काळात टी-२० विश्वचषक आणि २०२१ मधील महिला क्रिकेट विश्वचषकाच्या आयोजनासाठी काही पर्याय उपलब्ध होतात का याबद्दल ICC विचार करणार आहे. पण असे असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या आयोजनाबाबत असमर्थतता दर्शवून हात वर केले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याने प्रत्येक घटकाच्या सुरक्षेचा विचार करुन नवीन पर्याय शोधण्यावर ICC बैठकीत एकमत झालं आहे. त्यामुळे जुलै महिन्यातच T20 World Cup च्या आयोजनावर अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”