गायींची चोरी करणारी 5 जणांची टोळी तडीपार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | लोणंद परिसरात मारहाण करून लूटमार व गायींची चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी संपूर्ण सातारा जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्यातील तीन व सोलापूर जिल्ह्यातील एका तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

टोळीप्रमुख पप्पू सर्जेराव जाधव (वय- २४) व संजय ऊर्फ दादा बारीकराव जाधव (वय- ३७, दोघे रा. मुळीकवाडी, ता. फलटण), अजित महादेव बोडरे (वय- २८) व अनिल अशोक तुपे (दोघेही रा. तांबवे, ता. फलटण) आणि तुषार बाळासो पाटोळे (वय- २०, रा. तरडगाव, ता. फलटण) अशी त्यांची नावे आहेत. या पाच जणांना वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून सुधारण्याची संधी देण्यात आली होती; परंतु त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यांच्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांना तडीपार करण्याबाबत लोणंद पोलिसांनी पोलिस अधीक्षकांकडे तडीपारीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यावर सुनावणी घेऊन अधीक्षक बन्सल यांनी पाचही जणांना संपूर्ण सातारा जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, भोरे व पुरंदर, तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले.

हद्दपार प्राधिकरणाकडे सरकारच्या वतीने अतिरिक्त अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ, उपनिरीक्षक मधुकर गुरव, हवालदार प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस, तसेच लोणंद पोलिस ठाण्याचे हवालदार नाळे यांनी पुरावे सादर केले. अशांतता पसरविण्याविरुद्ध यापुढेही अशी कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अधीक्षक बन्सल यांनी दिला आहे.