सातारा | सातारा – कोरेगाव तालुक्यातील वाठार, रहिमतपूर व खटाव तालुक्यातील औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा, दरोड्याची तयारी, घरफोडीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या टोळीतील चौघांना पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. दरम्यान, पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंड दत्तात्रय दादासो मसुगडे (वय- 22) याला एक वर्ष करता चार तालुक्यातून हद्दपारीचे तालुक्यात करण्यात आल्याने असे एकूण पाच जणांना तडीपार करण्यात आले आहे. टोळीप्रमुख प्रदीप प्रकाश माने (वय- 26, रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव), अक्षय बाजीराव दोरके (वय- 20, रा. वाठार स्टेशन), विजय बाळू जाधव (वय- 19, रा. भाडळे, ता. कोरेगाव) व इर्शाद हारुण मुल्ला (वय – 36, रा. वाठार स्टेशन) अशी त्यांची नावे आहेत.
या चाैघांवर कोरेगाव व खटाव तालुक्यांत दरोडा, दरोड्याची तयारी, घरफोडी तसेच फळाचा गाडा उलटवून पेटवणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सुधारण्याचीही संधी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्यात सुधारणा झाली नाही. उलट त्यांच्याकडून दहशत व भीतीचे वातावरण निर्माण केले जात होते. त्यामुळे त्यांना तडीपार करण्याबाबत वाठार पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावावर हद्दपार प्राधिकरणापुढे सुनावणी सुरू होती. त्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलसीबी’चे उपनिरीक्षक मधुकर गुरव, हवालदार प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस, वाठार पोलिस ठाण्यातील हवालदार सचिन जगताप यांनी आवश्यक पुरावे सादर केले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी चौघांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.
गुंड दत्तात्रय मसुगडेही तडीपार
पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुंड दत्तात्रय दादासो मसुगडे (वय- 22) याला एक वर्षाकरिता जिल्ह्यातील चार तालुक्यांतून हद्दपार करण्यात आले आहे. दत्तात्रय (रा. रणसिंगवाडी, ता. खटाव) याच्याविरुद्ध दहिवडी व पुसेगाव पोलिस ठाण्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे यांनी पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार तडीपारीच्या आदेशाची अंमलबजावणी करून मसुगडेस माण, खटाव, कोरेगाव, फलटण या चार तालुक्यांतून एक वर्षासाठी हद्दपार केले.