महाविकास आघाडी सरकारमधील घोटाळेसम्राटांना पुरस्कार देणार; भाजप नेत्यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्यावतीने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. दरम्यान आता भाजप नेत्यांकडून राज्यात झालेल्या घोटाळ्यामागे आघाडीला नेत्यांचा समावेश असल्याचे सांगत सरकारमधील घोटाळेबाज मानकऱ्यांना घोटाळेरत्न, घोटाळेभूषण, घोटाळेवैभव आणि घोटाळेसम्राटांना वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पुरस्कार देणार असल्याची घोषणा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.

मुंबईत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशभर महाराष्ट्राचे नाव गाजविणाऱ्या सरकारच्या या कर्तबगारीची योग्य ती दखल घेतली जाणार आहे. राज्यातील घोटाळे, भ्रष्टाचाराला जबाबदार असलेल्यांचा उचित सन्मान करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. गेल्या वर्षभरात आरोग्य खात्यातील परीक्क्षेचा घोटाळा गाजला आहे. हजारो उमेदवारांचे अतोनात हाल करून उमेदवारांचे भवितव्य अंधारात ढकलण्याची कर्तबगारी दाखविल्याबद्दल राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना या सत्कार मालिकेतील पहिला मानाचा ‘घोटाळेरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार या मोहिमेअंतर्गत प्रदान करण्यात येणार आहे, असे उपाध्ये यांनी सांगितले.

आरोग्य खात्यात घोटाळे करून त्यावर माफी मागण्याचा मोठेपणा दाखविणारे टोपे हे ठाकरे सरकारमधील एकमेव मंत्री असल्याने, ते या सर्वोच्च पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. अनिल देशमुख यांनाही हा पुरस्कार देण्याचा भाजपचा मनोदय होता, पण त्याआधीच त्यांना मंत्रिपदावरून जावे लागल्याने ते या सर्वोच्च पुरस्कारास मुकले आहेत. त्यांचा योग्य ठिकाणी योग्य तो सन्मान व्हावा, अशी भाजपची मागणी असल्याचा टोला यावेळी उपाध्ये यांनी लगावला.

Leave a Comment