गुरुवारी संध्याकाळी शिवतीर्थावर उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना महाराष्ट्रातील या सत्ताबदलाचे मुख्य सूत्रधार असलेले शरद पवार लक्षात आले नाहीत तर नवलच..!! आपल्या ५० वर्षांपेक्षा अधिक काळाच्या राजकारणाचा अनुभव पणाला लावत शरद पवारांनी भाजपच्या लोकांना सत्तास्थापनेपासून दूर ठेवलं. हे करत असताना शिवसेनेच्या झोपलेल्या वाघाचा स्वाभिमानही त्यांनी जागृत करुन दिला. गेली ५ वर्षं आपल्या खिशात राजीनामा घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना इथून पुढे मात्र काही कालावधीसाठी का होईना सत्तेचा मनसोक्त आनंद उपभोगता येणार आहे. राजकारणात कुणीच कुणाचं कायमचं शत्रू नसतं हा विचार डोक्यात घेऊन महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडीचं सरकार आता अस्तित्वात आलं. ‘मला माझ्या जुन्या मित्रांसोबत आता काम करता येईल’ हे छगन भुजबळ यांनी केलेलं सूचक विधान याबाबतीत खूप बोलकं आहे. शपथविधीसाठी देशभरातील विविध मान्यवरांना निमंत्रण दिली गेली होती. यामध्ये ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांचा प्रामुख्याने समावेश होता.