कृषी विद्यापीठाच्या गुणपत्रिकेवर ‘कोविड १९’ उल्लेख करणाऱ्यांवर कारवाई करा!- कृषी मंत्री दादा भुसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर प्रमोटेड कोविड-१९ असा शिक्का असल्याच्या बातमीने मंगळवारी चांगलीच खळबळ उडाली. या घटनेची दखल घेत कृषी मंत्री दादा भुसे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश कृषीमंत्री भुसे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला दिले आहेत.

यासंदर्भात महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांना व सर्व कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठविलेल्या पत्रात कृषीमंत्र्यांनी म्हटले आहे की, कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-१९ चा उल्लेख शासन आदेश नसतानाही करण्यात आला आहे. असा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्या संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश या पत्रात दिले आहेत.

दरम्यान, राज्यात कृषी महाविद्यालयाचे २८००० विद्यार्थी आहेत. अमरावतीतील एका कृषी विद्यालयाने २४७ विद्यार्थींना कोविड १९ चा शिक्का असलेले प्रमाणपत्र दिले आहे. ही चूक ज्यांनी केलीय त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासनही भुसे यांनी दिले आहे. तसेच २४७ विद्यार्थ्यांना दिलेली कोविड- १९ ची प्रमाणपत्रे परत घेतली जातील आणि त्यांना कोविडचा शिक्का नसलेली नवीन प्रमाणात दिली जातील, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”