औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीला कोरोना झाला म्हणून त्याने उपचारासाठी काही दिवस रजा घेतली. पण कंपनीने त्याला थेट कमावरूनच काढून टाकले. कोरोनाकाळात कंपनीने कामावरून काढून टाकल्याने आरोपीने नैराश्यात जाऊन आत्महत्या केली आहे. त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे समजताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव प्रदीप हिरालाल भाकरवाल असे आहे. ते 53 वर्षांचे होते. मृत भाकरवाल हे आपली पत्नी आणि दोन मुलांसह एम-2 मध्ये राहत होते. गुरुवारी सायंकाळी त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मृत भाकरवाल यांना मार्च महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी काही दिवस कामामधून रजा घ्यावी लागली होती. त्यांनी रजा घेल्यामुळे कंपनीने त्यांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे मागच्या काही महिन्यांपासून ते तणावात होते. गुरुवारी दुपारी मृत भाकरवाल यांनी आपली दोन मुले आणि पत्नीसोबत जेवण केले. यानंतर ते आपल्या घराच्या मागच्या खोलीत गेले.
नेहमीप्रमाणे प्रदीप झोपले असतील, या विचाराने पत्नीने त्यांना आवाज दिला नाही. यानंतर रात्री नऊच्या सुमारास मृत भाकरवाल यांचा मुलगा रात्रीच्या जेवणासाठी त्यांना उठवायला गेला असता त्याला रूममधून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुलाने खिडकीतून डोकावले असता त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत वडिलांचा मृतदेह आढळून आला. मृत प्रदीप यांनी नोकरी गेल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.