नवी दिल्ली । 24 जानेवारी हा दिवस देशातील मुलींच्या नावाने राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सामाजिक सुरक्षेचा संकल्प करून मुलींना आर्थिकदृष्ट्या बळकट बनवणेही खूप महत्त्वाचे आहे आणि याची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही.
मुलीच्या जन्मानंतर पालकांना तिचे शिक्षण, लग्न आणि इतर खर्चाची चिंता सतावू लागते. सततच्या वाढत्या महागाईच्या काळात या खर्चासाठी एवढ्या मोठ्या रकमेची अचानक व्यवस्था करणे कुणालाही शक्य होत नाही. दीर्घकालीन नियोजनानंतर थोड्या गुंतवणुकीतून फंड तयार केला, तर आगामी काळात मोठा निधी जमा होऊ शकतो. यामुळे लग्नाच्या खर्चाची चिंता तर कमी होईलच, त्याबरोबरच मुलीच्या आयुष्यातील इतर आर्थिक समस्याही सहज सुटतील. आम्ही तुम्हाला मुलीसाठी अशाच पाच गुंतवणुकीच्या टिप्स सांगणार आहोत, ज्या सर्वात प्रभावी ठरू शकतात.
सुकन्या समृद्धी योजना (SSY)
मुलीसाठी सर्वात लोकप्रिय गुंतवणूकिचा पर्याय म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. हे खाते जास्तीत जास्त दोन मुलींच्या नावाने कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. यामध्ये, 1,000 रुपयांपासून सुरू होऊन, 1.5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक जमा केले जाऊ शकते, ज्यावर 7.6 टक्के व्याज दिले जात आहे. मुलगी 21 वर्षे पूर्ण झाल्यावर हे खाते मॅच्युर होईल आणि संपूर्ण रक्कम काढता येईल.
चिल्ड्रन गिफ्ट म्युच्युअल फंड
चिल्ड्रन गिफ्ट म्युच्युअल फंड योजना विशेषतः मुलींच्या नावाने सुरू केली आहे. याचा लॉक-इन कालावधी 18 वर्षांचा आहे, ज्यामधून भविष्यात मोठी रक्कम जमा केली जाऊ शकते. ही रक्कम इक्विटी आणि डेट फंडात गुंतवली जाते. यावर कोणतेही निश्चित व्याजदर नसले तरी शेअर बाजाराशी निगडीत असल्याने जोरदार रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही दरमहा 5 हजार रुपये SIP द्वारे गुंतवले तर 12 टक्के दराने तुम्हाला 18 वर्षांत 38,27,197 रुपये मिळतील. तुमची एकूण गुंतवणूक फक्त 10.80 लाख रुपये असेल.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट(NSC)
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) ही पोस्ट ऑफिस स्कीम मुलींच्या नावानेही उघडता येते. ते सध्या वार्षिक 7.6 टक्के गॅरेंटेड रिटर्न देत आहे. यामध्ये 1,000 रुपयांच्या नाममात्र रकमेतून गुंतवणूक सुरू करता येते, तर जास्तीत जास्त गुंतवणुकीच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. त्याच्या मॅच्युरिटीचा कालावधी 5 वर्षे आहे, ज्यावर टॅक्स सूट देखील उपलब्ध आहे. हे खाते एका नावावरून दुसऱ्या नावावरही ट्रान्सफरही करता येते.
युनिट लिंक्ड विमा योजना (ULIP)
इन्शुरन्स कंपन्यांनी देऊ केलेली ही योजना मुलींना दुहेरी संरक्षण देते. ULIP मध्ये लाईफ इन्शुरन्सचा लाभ मिळण्यासोबतच, मॅच्युरिटीवर भरघोस रिटर्नच्या स्वरूपात मोठा फंड देखील तयार केला जातो. वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या ULIP योजनांचे फायदे वेगवेगळ्या प्रकारे ठरवतात, ज्यावर 7 ते 9 टक्के वार्षिक व्याज मिळते. या योजनेत मुलीच्या शिक्षणासाठी दरमहा पैसे भरण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
गोल्ड ईटीएफ
तुम्हाला तुमच्या मुलीसाठी सोन्याचे दागिने किंवा इतर दागिने घ्यायचे असतील, तर गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे. हे गोल्ड फंड शेअर मार्केटमध्ये ट्रेड केले जातात, ज्यात इतर योजनांपेक्षा जास्त रिटर्नमिळण्याची क्षमता असते. तसेच ते सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्याही लॉकरची गरज नाही आणि चोरीची भीतीही नाही. यामध्ये मॅच्युरिटी पिरियड देखील नाही, जेणेकरुन तुम्ही जेव्हा हवे तेव्हा ते विकून मुलीसाठी वापरू शकता.
आपण ‘या’ पर्यायांचा देखील विचार करू शकता
मुलीला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी तुम्ही तिच्या नावावर PPF खाते उघडू शकता. याशिवाय पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट, SIP, FD आणि पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) ची खाती देखील उघडता येतात.