हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे सर्वत्र हिरवागार असा निसर्ग पहायला मिळत आहे. अशा निसर्गाच्या वातावरणात शनिवार-रविवार आला कि मग बेत केला जातोय तो पिकनिकचा. तुम्हीही ऐतिहासिक किंवा निसर्ग ठिकाणाला भेट द्यायचा विचार करत असला तर मग तुमच्यासाठी पाटण तालुक्यातील एक ऐतिहासिक असे ठिकाण आहे कि ज्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एक अद्भुत अशा पद्धतीने बांधण्यात आलेली विहीर पहायला मिळेल. ती म्हणजे पाटणजवळील दातेगड सुंदरगडावरील तलवारीचा आकार असलेली भव्य विहीर होय. सध्या पर्यटकांची पावले या ठिकाणी वळू लागली आहेत.
महाराष्ट्रात अनेक निसर्ग पर्यटनस्थळे आणि प्रसिद्ध ऐतिहासिक गडकिल्ले आहेत. या गडांशी सातवाहनांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांचे नाते जोडले गेले आहे. अशा ठिकाणी पावसाळ्यात एक निर्सगाचा वेगळाच अनुभव पहायला मिळतो. दाट धुके, हिरवेगार गवत आणि निर्सगाचा तो अदभूत नजारा पाहताना एक वेगळाच आनंद येतो.
असा आनंद घ्यायचा असेल तर मग सातारा जिल्ह्यातील पाटणजवळील दातेगडला नक्की भेट द्याच. चारही बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचं वैशिष्ट्यं म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडात खोदून तयार केल्यात. त्यापैकी एक म्हणजे तलवारीचा भव्य आकार असलेली विहीर होय.
किती आहे अंतर?
सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यापासून केवळ 6 किलोमीटर अंतरावर दातेगड गड आहे. गडापर्यंत पोहोचण्यासाठी कराड – कोयनानगर मार्गावरील पाटण येथे यावे लागते. या ठिकाणी आल्यानंतर पुढे गावातून चाफोली रोड जातो, त्या रस्त्याने 15 मिनिटं चालल्यानंतर डाव्या बाजूलाच लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. या पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर दातेगडावरून उतरत रस्त्याने साधारण 50 मिनिटे चालल्यानंतर दर्गा लागतो. तिथून गडाच्या पायथ्याशी असलेले टोळेवाडी गाव लागते. हा भाग डोंगराळ असल्याने गडावर पोहोचण्यासाठी पायी चालत जावे लागते.
असा आहे गडाचा इतिहास –
दातेगड नावेने प्रसिद्ध असलेला आणि तलवार विहिरींमुळे कायम पर्यटकांनी गजबजलेल्या या गडाचा इतिहास वेगळाच आहे. हा किल्ला काही काळ मोगलांच्या अधिपत्याखाली होता. या गडावर तलवारीचा आकार असलेली भव्य विहीर आहे. ती इतिहासकालीन शिल्पकलेची चुणूक दाखवते. किल्ल्याच्या पश्चिम टोकावर अखंड खडकात खोदलेली ही विहीर किल्ल्याच्या दक्षिणेला आहे. अखंड खडकातील विहिरीत उतरण्यासाठी 41 पायऱ्या आहेत. त्यापैकी काही पायऱ्या ढासळलेल्या अवस्थेत आहेत. या पायऱ्यांवरून विहिरीत उतरल्यानंतर विहिरीच्या मध्यभागी पश्चिम बाजूला महादेवाचं मंदिर खोदण्यात आले आहे. त्याचा आकार भव्य आहे आणि या वरूनच या तलवार विहिरीची भव्यता जाणवते. मंदिरात शिवलिंग असून, मंदिरापासून खाली काही अंतरावर पाणी आहे.
वैशिष्टयपूर्ण अशी दोन मंदिरे –
तलवार विहिरीपासून जवळच अखंड खडकात खोदलेले गणपती आणि मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरात उतरण्यासाठी 29 पायऱ्या उतराव्या लागतात, या मंदिरावर कोणतंही आच्छादन नाही. चौकोनी आकाराच्या खोदकामात दक्षिणाभिमुख गणपती आणि पश्चिमाभिमुख मारुती अशा मूर्ती आहेत. मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की, सूर्योदयाला सूर्यकिरणं थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात आणि सूर्यास्तासमयी किरणं मारुतीच्या मूर्तीवर येतात. अशा रचनेत खोदलेले हे मंदिर पूर्व इतिहासातील शिल्पकारांची बौद्धिकता जाणवून देते.
उंच टेहळणी टेकडी –
दातेगडावर गेल्यानंतर निसर्गासोबत उंच अशा टेहळणी टेकडी वरून एक वेगळाच नजारा पहायला मिळतो. या टेकडीवरून कोयनेचा नागमोडी प्रवाह, पाटण शहर, पवनचक्की प्रकल्प, सह्याद्रिच्या अफाट पसरलेल्या रांगा आकर्षित करतात. दातेगडाला सुंदरगड असेही नावाने ओळखले जाते. आपलं हे नाव सर्वार्थानं सिद्ध करणारा हा किल्ला खरंच पाहण्याजोगा आहे. तसेच तलवार विहीर हि एक अदभूत असा अविष्कारही आहे.