कराड | कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीच्या निर्णयानंतर सातारा जिल्ह्यातील तांबवे या गावात विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर केला आहे. सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून अोळखल्या जाणाऱ्या तांबवे गावाने सातारा जिल्ह्यात ठराव करत पहिला बहुमान मिळवला आहे.
तांबवे ग्रामपंचायतीच्या आज दि. 20 मे रोजी झालेल्या मासिक सभेत ठराव करण्यात आला. उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील यांनी ठराव मांडला, त्यास सदस्य जयश्री कबाडे यांनी अनुमोदन दिले आहे. यावेळी तांबवे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी एकमताने ठराव क्रमांक 17 विधवा प्रथा बंद करण्याबाबत मंजूरी दिली. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा घेतलेल्या ठरावाबद्दल अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला.
तांबवे ग्रामपंचायतीच्या ठरावात म्हटले आहे की, आपल्या समाजात पतीच्या निधनावेळी अंत्यविधीवेळी, पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे तसेच महिलाला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे, म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे. तरी आपल्या गावामध्ये व देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे. या करिता विधवा प्रथा बंद करणेत येत आहे. या संदर्भात गावामध्ये जनजागृती करणेत यावी. त्यास या सभेची मंजूरी आहे.