Tandoor Ban : तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर तंदूर रोटी कधी ना कधी ऑर्डर केलीच असेल आणि अनेक खवय्यांची पसंती म्हणजे ही तंदूर रोटी किंवा तंदूर भट्टीत भाजलेले पदार्थ आहे. मात्र आता मुंबई मधल्या जवळपास सगळ्याच हॉटेल्स आणि बेकऱ्यांमधून तंदूर भट्टी हटवण्याची महत्त्वपूर्ण ऑर्डर मुंबई महापालिकेकडून बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईतील हॉटेल चालक आणि बेकरी चालकांना (Tandoor Ban) हा नियम पाळावा लागणार आहे.
काय आहे कारण?
देशभरात सर्वत्र ग्रीन एनर्जी वापरण्यावर भर दिला जात आहे. अशातच मुंबई महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे, कोळसा तंदूर भट्टी ऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजी,पीएनजी, एलपीजी चा वापर किचन मध्ये करण्याच्या सूचना महापालिकेकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील एकही बेकरी आता जळाऊ लाकडावर चालणार नाही त्याऐवजी सीएनजी पीएनजी वापरावे असे आदेशच आयुक्तांनी सर्व बेकरी चालक रेस्टॉरंट आणि धाबा तसंच हॉटेल चालकांना दिली आहे.
9 जानेवारी 2025 च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीएमसीच्या हद्दीत लाकूड कोळसा किंवा इतर पारंपारिक इंधन वापरणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे कोळसा तंदूर भट्टीचा वापर करून तंदूर तयार करणाऱ्या हॉटेल मालकांना आता हॉटेलमध्ये बदल करावे लागणार आहेत.
अन्यथा कठोर कारवाई
हॉटेल चालकांनी हा बदल 28 जुलैपर्यंत करावा अशा देखील सूचना देण्यात आल्या असून कोळसा तंदूर भट्टी ऐवजी इलेक्ट्रिक उपकरणाचा वापर न केल्यास मुंबई महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही या नोटीस मधून सर्व व्यवसायिकांना दिला आहे. जर या नियमाचे पालन केले नाही तर परवाना रद्द करणे दंड आणि कायदेशीर कारवाईसह कठोर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 84 ढाबे, हॉटेल आणि रेस्टॉरंट तसंच तंदूर आस्थापनांना मुंबई महापालिकेकडून याबाबतची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल आणि ढाबा मालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने सूचना जारी करून रेस्टॉरंट चालक व धापा मालकांना ही नोटीस बजावली आहे.