सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक एकच्या कार्यालयात भरदुपारी सर्व कर्मचारी आणि अधिकारी चक्क तंदूर बिर्याणीचा आस्वाद घेत असल्याचे निदर्शनास आले. याबरोबरच टीव्हीवर क्रिकेट मॅच बघण्यात मग्न झालेल्या या कर्मचाऱ्यांनी बाहेर कामासाठी आलेल्या पक्षकारांना मात्र ताटकळत ठेवले.
सातारा तहसील कार्यालयाच्या आवारातच सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय आहे. तालुक्यातील समाविष्ट गावांमधील जमीन -खरेदी विक्रीचे दस्त या ठिकाणी होतात. त्यामुळे नेहमीच गर्दी असते, मात्र दुपारच्या सुमारास कार्यालयातच बिर्याणीचा भरलेला टोप आणि त्यासोबत तंदुरी- चिकन आणण्यात आले. मग काय उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम बाजूला सारले अन् बाह्या मागे सारत कार्यालयातील टेबलवरच तंदूर बिर्याणीवर ताव मारला. याबरोबरच सोबतीला भारत- बांग्लादेश क्रिकेट मॅचचाही आस्वाद घेण्याचे काम सुरू होते. याचवेळी कामासाठी आलेले पक्षकार ही पार्टी कधी संपेल याची वाट पाहत ताटकळत उभे होते. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्याला याच सोयरे- सुतक नव्हतं. याबाबत विचारणा करणाऱ्या पत्रकारांनाही संबंधित अधिकाऱ्यांनी उद्धट उत्तरे दिली.
आता या पार्टीची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली. या कार्यालयात नेमकं चाललय काय ही तंदूर बिर्याणी कोणत्या पक्षकाराने दिली कोणत्या कारणाने दिली. याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांकडून होणार का असा प्रश्न उपस्थित केला जावू लागला आहे. या तंदूर बिर्याणी मेजवानीची खुमासदार चर्चा संपूर्ण दिवसभर तहसील कार्यालय परिसरात सुरू होती.