हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चालकाचा ताबा सुटून वाहनांची धडक होत आहेत. अशीच एक घटना सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरील आनेवाडी टोल नाक्याजवळ उडतारे गाव परिसरात घडली. या ठिकाणी चालकाचा ताबा सुटल्याने टँकरने महिलांना धडक दिली. या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या असून एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सातारा हद्दीतील आनेवाडी टोलनाक्याजवळ वाहनाच्या प्रतीक्षेत महिला व मुलगी उभी होती. यावेळी महामार्गावरून टँकर क्रमांक (GJ 20 V 7473) निघाला होता. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने टँकर महिलांच्या अंगावर गेला. या अपघातात दोन महिला ठार झाल्या. तर सायली दिलीप कांबळे ही मुलगी जखमी झाली.
या अपघातानंतर परिसरातून जाणाऱ्या नागरिकांनी जखमी मुलीस तात्काळ उपचारासाठी क्रांतीसिह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तर अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.