कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान राबविण्यात आले. यामध्ये कराड तालुक्यातील तासवडे गावने सातारा जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या गावची नुकतीच विभागीय समितीकडून पाहणी करण्यात आली.
राज्य शासनाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान राबविण्यात आले. यामध्ये पुणे विभागातील पाच जिल्ह्यातील सुमारे साडेसात हजार गावांनी सहभाग घेतला. यातून फक्त दहा गावे विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. यामध्ये कराड तालुक्यातील तासवडे गावचा समावेश करण्यात आला. या गावास विभागीय सहायक आयुक्त विकास मुळीक, उपायुक्त सिमा जगताप, माहिती विभागाचे उपसंचालक पुरषोत्तम पाटोदकर, सहायक प्रशासन अधिकारी प्रकाशकुमार बोबले, मिलींद टोनपे यांनी भेट दिली.
यावेळी अधिकाऱ्यांनी गावातील ग्रामस्थांशी चर्चा केली तसेच गावातील पाणी पुरवठा, स्वछता, गावची करवसुली, शाळा, अंगणवाडी, गटर, रस्ते, सांडपाणी व घनकचरा प्रकल्प आधी ठिकाणी भेट देत तपासणी केली. यावेळी कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी कांबळे, विस्तार अधिकारी पोतदार, सरपंच लता जाधव, उपसरपंच सुभाष जाधव सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.