कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाबळेश्वर येथे पर्यटकांना लागु असलेला प्रवेशकर, प्रदुषणकर व नौकाविहाराच्या दरात वाढ करण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे. लॉकडाउन नंतर येणाऱ्या पर्यटकांना वाढलेला प्रवेशकर देवुनच शहरात यावे लागणार आहे. या दरवाढीमुळे पालिकेच्या तिजोरीत वर्षाला साधारण दिड कोटींची भर पडणार आहे. टोल मुक्त महाबळेश्वरचे स्वप्न पाहणाऱ्या पर्यटकांना पालिकेने केलेल्या दरवाढीला सामोरे जावे लगणार आहे.
पर्यटकांचे माहेरघर महाराष्ट्राचे नंदनवन व प्रसिध्द थंड हेवेचे ठिकाण म्हणुन महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ देशात तसेच परदेशात प्रसिध्द आहे. येथील अनोखे नयनरम्य विलोभनिय असे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी देशभरातुन दरवर्षी येथे साधारण वीस लाख पर्यटक भेट देतात. महाबळेश्वरची लोकसंख्या तशी कमी आहे, परंतु हंगामात पर्यटकांची मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे नागरीकांना प्राथमिक सुविधा पुरविताना पालिकेवर अतिरिक्त ताण पडतो, म्हणुन येथे सहलीसाठी आलेल्या पर्यटकांकडुन पालिका प्रवेशकर गोळा करते. पुर्वी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेने पर्यटक येत असत, परंतु आता घरोघरी वाहन दिसु लागली आहेत. पर्यटक आपल्या वाहनानेच येणे अधिक पसंत करीत आहेत. मोठया संख्येने वाहने शहरात आल्याने शहरातील प्रदुषणात वाढ होतेच. परंतु वाहतुकीची कोंडी देखिल कायम होत असते. वाहतुकीची कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालिकेला वाहनतळाची सोय करावी लागते, म्हणुन पालिका आता पर्यटकांच्या वाहनांना कर प्रदुषण कर आकारते.
येथे आलेल्या पर्यटकांच्या मनोरंजना साठी पालिकेच्या वतीने वेण्णालेक येथे नौका विहाराची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी दोन प्रकारच्या बोटी असुन या दोन्ही प्रकारच्या बोटींचे दर वेगवेगळे आहेत. प्रवेशकर, प्रदुषणकर व नौकाविहार ही पालिकेच्या उत्पन्नाची प्रमुख साधणे आहेत. या पासुन पालिकेला वर्षाला साधारण सात कोटी रूपयांचे उत्पन्न मिळते. परंतु आता पालिकेने प्रवेशकर, प्रदुषणकर व नौकाविहार यांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या प्रमाणे एक एप्रिल पासुन दरवाढ अमलात आणण्यात आली आहे. पुर्वी प्रत्येकी 20 रूपये प्रवेशकर वसुल केला जाता होता. आता या मध्ये पाच रूपयांची वाढ करून प्रवेशकर प्रति माणसी 25 रूपये करण्यात आला आहे. लहान वाहनांना पुर्वी 30 रूपये तर जड वाहनांना 50 रूपये प्रदुषण कर आकारला जात होता. आता या मध्ये वाढ करण्यात आली आहे 30 ऐवजी 50 रूपये लहान वाहनांना तर जड वाहनांना 50 ऐवजी 100 रूपये आकारले जात आहेत.
वेण्णालेक येथील नौका विहाराच्या दरातही साधारण प्रतितास 50 ते 100 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे पालिकेच्या उत्पन्नात चांगलीच घसघशीत वाढ होणार आहे. पालिकेला दरवर्षी या दरवाढीमुळे 1 ते दिड कोटी रूपयांचे जादा उत्पन्न मिळणार आहे. महाबळेश्वरच्या सहलीसाठी आलेल्या पर्यटकांना केवळ पालिकेलाच कर दयावा लागतो असे नाही. तर येथील वन विभागाच्यावतीनेही पर्यटकांकडुन प्रवेशकर गोळा केला जातो. तसेच क्षेत्र महाबळेश्वर ही ग्रामपंचायतही पर्यटकांकडुन प्रतिमाणसी कर गोळा करते. त्यामुळे यापुढे येताना पर्यटकांनी प्रवेशकरासाठी वेगळी तरतुद करूनच महाबळेश्वरच्या सहलीवर येण्याचा बेत करावा लागणार आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा