TDM Review | गावगाड्यात फुललेल्या अस्सल प्रेमाची गोष्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TDM हा गावाकडचं जगणं अनुभवलेल्या प्रत्येकाला रिलेट होणारा चित्रपट आहे. २-४ दिवसांसाठी गावाकडे जाऊन चेंज अनुभवणाऱ्या शहरी लोकांना TDM हा अस्सल गावाकडचा फील देणारा, त्या जगण्याची जवळीक दाखवणारा चित्रपट आहे. गावाकडची जी मुलं-मुली शिक्षण किंवा नोकरीसाठी गाव सोडत नाहीत, मात्र परिस्थितीपुढे शरण न जाता स्वतः गावातच खपून काम करतात, आईबापाला मदत करतात त्या प्रत्येकाची कहाणी म्हणजे TDM चित्रपट.

बाबू (पृथ्वीराज थोरात) आणि निलिमाची (कालिंदी निस्ताने) हलकी फुलकी प्रेमकहाणी हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. वयात आलेल्या आणि प्रेमाचे गुलाबी दिवस अनुभवलेल्या प्रत्येकाला बाबू आणि नीलिमामध्ये स्वतःला शोधता येईल. पण त्याहीपलीकडे जाऊन गावाकडची गरिबी, शिक्षणाच्या वाटेतून बाहेर पडलेली तरुण पिढी, वर्षांनुवर्षं चालत आलेलं गावातलं टगेगिरीचं राजकारण, गावाकडची लग्नं, पोरा-पोरींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आई-बाप खात असलेल्या खस्ता, पैशांची तारांबळ आणि या सगळ्यासोबत सुरू असलेला जिंदगीचा रहाटगाडा नेमकेपणाने दाखवण्याचं काम TDM चित्रपट करतो.

भाऊराव कऱ्हाडे यांचे चित्रपट तुम्हाला गावगाड्याच्या अगदी जवळ नेतात. हिंदी चित्रपटांत अनुराग कश्यपने Gangs of Wasseypur च्या निमित्ताने जो रॉ नेस (रांगडेपणा) दाखवला तोच अस्सलपणा भाऊराव कऱ्हाडेंच्या प्रत्येक चित्रपटात जाणवतो. TDM मध्येही लोकांची भाषा, त्यातला शिवराळपणा, राहणीमान, रस्ते, गाड्या या सगळ्यांची परफेक्ट भट्टी जमून आलेली आहे. TDM म्हणजे ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. गावाकडे अनेक मुलांना ही पदवी माहीत असते, पण ज्यांना हे माहीत नसेल त्यांना चित्रपटाच्या अगदी मध्यापर्यंत हे समजणार नाही. अगदी नावाप्रमाणेच चित्रपटात ट्रॅक्टरचा वापर समर्पकपणे केला आहे. ट्रॅक्टरवर वाजवली जाणारी गाणी तुम्ही या चित्रपटात एन्जॉय करू शकता. चित्रपटातली गाणीसुद्धा अफलातून झाली आहेत. एक फुल आणि मन झालं मल्हारी ही गाणी तुम्हाला नव्याने प्रेमात पाडणारी आहेत. प्रेमाची नजाकत अनुभवायला लावणारी आहेत. बकुळा हे गाणं लग्न करून सासरी निघालेल्या मुलीला साद घालणारं गाणं म्हणून लक्षात राहणारं आहे. माहेरची साडी या गाण्यानंतरचा जिवंतपणा बकुळाने प्रेक्षकांसमोर आणला आहे.

कॅमेरा, लोकेशन्स आणि चित्रपटातील पात्रांची निवड ही आणखी जमेची बाजू. चित्रपटाच्या नायक-नायिकेचं हे पदार्पण असलं तरी दोघांच्याही अभिनयात तो नवखेपणा जाणवत नाही. रोजच्या जगण्यातील सहजपणा त्यांच्यात दिसून येतो म्हणूनच ही गोष्ट प्रेक्षकांना आपली वाटते. सहकलाकार म्हणून भूमिका मिळालेल्या प्रत्येकाने आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. कुठल्याही प्रस्थापित किंवा प्रशिक्षित अभिनेता किंवा अभिनेत्रीला न घेता अधिक जिवंत, वास्तव चित्रपट साकार करण्याची किमया भाऊराव कऱ्हाडे आणि नागराज मंजुळे हे दोन दिग्दर्शक करून दाखवतायत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे लोकांना हे चित्रपट आपले वाटतायत. गावाकडच्या लोकांनी आपलं रोजचं जगणं पडद्यावर पाहण्यासाठी तर शहरी लोकांनी गावगाडा समजून घेण्यासाठी हा चित्रपट पहायला हवा. या आठवड्याची आणि महाराष्ट्र दिनाची सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी हा चित्रपट झकास आहे.

रेटिंग – 4.8