औरंगाबादेत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होणार शिक्षक दिन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपुर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त 2020-21 मध्ये ‘थँक्स अ टिचर’ अभियान राबविले होते. यावर्षी देखील शिक्षकांचा गौरव करण्यासाठी ‘थँक्स अ टिचर’ अभियानाअंतर्गत शिक्षकांचे कार्य गौरव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्व आहे. शिक्षक आपल्या अध्ययन अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होवून जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत, या काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांनी विविध उपक्रम राबविले. दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जावून, समुह मार्गदर्शन वर्ग घेतले. अशा शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाकडून 2 ते 5 सप्टेंबर या कालावधीत ‘थॅक्स अ टिचर’ अभियानाअंतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावे, या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन-ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे. तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाजाचा सक्रीय सहभाग असावा, असे पत्र महाराष्ट्र शासनाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी जारी केले आहे.

Leave a Comment