तीन वर्षांपासून शिक्षकांचे मानधन थकले! आता शिक्षक निवडणुकीसाठी काम करणार का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यात अनेक शिक्षकांना बीएलओ या पदावर नियुक्ती दिली आहे. या कामाच्या मोबदल्यात शिक्षकांना सहा हजार रुपये मानधन मिळते. मात्र २०१८ पासून शिक्षकांना हे मानधन मिळाले नाही. त्याच मानधनाची मागणी करण्याची सिल्लोड तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने सोमवारी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.

वास्तविक पाहता निवडणूकीचे कामे व त्या संदर्भातील अनुदान व मानधन त्वरित अदा करणे आवश्यक आहे. परंतु सलग तीन वर्षांचे बीएलओ मानधन थकल्यामुळे सर्वच शिक्षकांमध्ये तीव्र असंतोषाची लाट उसळलेली आहे. पुढील दहा दिवसात हे मानधनखात्यावर मानधन जमा न झाल्यास तीव्र धरणे आंदोलन करून, कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने देण्यात आला आहे. कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापन कार्य केलेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करून या सेवेची सर्विस बुक मध्ये नोंद घेऊन शिक्षकांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देण्यात यावे.

४५ दिवसांची विशेष अर्जित रजा मान्य करण्यात यावी अशी शिक्षक संघटनांची मागणी आहे. याच बरोबर कोरोना काळात आपल्या कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक वारसांना अनुकंपा धरतीवर शासकीय नोकरीत प्राधान्य देण्यात यावे. मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च राज्य शासनाने करावा व कायमस्वरूपी मदत म्हणून ५० लाखाचे अनुदान कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळावे अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी शिक्षक संघटना समन्वय समितीतील मिलिंद घोरपडे, गणेश धनवई, जे. के. देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.