कराड | शैक्षणिक क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. त्यामुळेच नॅकच्या धर्तीवर आता उच्च माध्यमिक स्तरावर शाळासिद्धी मूल्यांकन सुरू असून, त्या पद्धतीने महावि़द्यालयांचे मूल्यमापन केले जात आहे. त्यामुळे भविष्याचा वेध घेत शिक्षकांनी अद्ययावत अध्यापनकौशल्ये आत्मसात करावीत, असे प्रतिपादन इचलकरंजी येथील डी. के. ए. एस. सी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले. कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात संस्थांतर्गत पथक तपासणी आणि शाळासिद्धी मूल्यांकनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सहविचार सभेत ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. महेश गायकवाड होते. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या नेतृत्वातील संस्थांतर्गत तपासणी पथकाने पाठनिरीक्षण करून शाळासिद्धी मूल्यांकन व प्रमाणीकरण नोंदवहींचा आढावा घेतला. तपासणी पथकाने महाविद्यालयाचे व्यवस्थापन, स्वच्छता, भौतिक व शैक्षणिक सुविधा इत्यादींबाबत समाधान व्यक्त केले. या पथकात प्रा. एम. बी. पाटील, प्रा. एस. जी. कुंभार, प्रा. एस. एस. पाटील, प्रा. एस. के. पाटील, प्रा. आर. बी. शिरढोणे, प्रा. व्ही. ए. जालीहाळे, प्रा. एम. एम. पाटील, प्रा. बी. सी. हिटनाळी व प्रा. एम. जे. विरकर यांचा समावेश होता.
डॉ. पाटील पुढे म्हणाले, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय हे शैक्षणिक संकुल नयनरम्य, प्रसन्न आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहे. दूरदृष्टी लाभलेले व अष्टपैलू प्राचार्य डॉ.महेश गायकवाड यांच्यामुळे कला, क्रीडा, पत्रकारिता इ . क्षेत्रात महाविद्यालय नावारुपास आले असून, भविष्य उज्ज्वल असल्याचे मत व्यक्त केले. आज सर्वसमावेशक व सर्वोत्तम अध्यापनाची गरज आहे. शैक्षणिक संसाधनांचा वापर करून परिणामकारक अध्यापनकार्य केले जाऊ शकते. तंत्रज्ञानाच्या गतिमानतेमुळे आगामी काळात शिक्षणक्षेत्रात मोठे परिवर्तन होणार आहे. त्यामुळे शिक्षकांसमोर अनेक आव्हाने असतील. त्या आव्हानांच्या तयारीसाठी आतापासूनच आपण सज्ज असले पाहिजे.
महाविद्यालयाचे प्र . प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले, शिक्षणक्षेत्राने काही गोष्टी नव्याने स्वीकारल्या असल्या तरी अध्यापनाची काही मूल्ये कायमस्वरूपी आहेत. हीच मूल्ये व अध्यापन पद्धती आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुन्हा नव्याने आजच्या विद्यार्थ्यांसमोर येत आहेत. शिक्षण व्यवस्थेने स्वीकारलेला हा माध्यमांचा बदल प्रत्येक गुरूदेव कार्यकर्त्याने अंगीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सहविचार सभेचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. सुरेश रजपूत यांनी केले. प्रा. सुरेश यादव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.