कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या बदलीचे आदेश झाले आहेत. मात्र ही बदली अन्यायकारक असून नियमबाह्य असून त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही. अद्याप सहा महिने बाकी असताना झालेली बदली रद्द करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सचिन नलवडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात तहसीलदार वाकडे यांनी कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन खूप चांगले काम केले आहे. कोरोना काळात शासनाच्या निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबर रुग्णालय व कोरोना सेंटर सुरू करून रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यात यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. नुकत्याच उद्भवलेल्या महापुराची परिस्थिती त्यांनी योग्य पद्धतीने हाताळली. नदीकाठावरील हजारो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. त्यांना आवश्यक सेवा पुरविल्या.
उपेक्षित, गरीब, गरजूंना रेशन कार्ड व त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे कराडकर यांच्या वतीने आम्ही निवेदन देत असून तहसीलदार वाकडे यांची अन्यायकारक बदली रद्द करावी. दरम्यान शेतकरी नेते सचिन नलवडे व शेतकऱ्यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांची अन्यायकारक बदली रद्द व्हावी, या मागणीचे निवेदन दिले आहे.