हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tejaswini Pandit) मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तेजस्विनी पंडितने केवळ अभिनयातून नव्हे तर निर्मिती क्षेत्रातून देखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने निर्मित क्षेत्रात आणखी एक मोठी उडी घेतल्याचे नुकतेच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. अलीकडेच तेजस्विनी पंडित बॉलिवूडच्या बड्या निर्मात्यासोबत काम करणार अशा बातम्या समोर आल्या होत्या. यानंतर अखेर आज तिने वर्धा नाडियाडवाला एंटरटेनमेंटसोबत ज्या प्रोजेक्टसाठी हातमिळवणी केली त्याची घोषणा केली आहे.
तेजस्विनीच्या नव्या चित्रपटाची घोषणा (Tejaswini Pandit)
महिला दिनाचे खास औचित्य साधून वर्धा नाडियाडवाला यांच्या जोफिएल एंटरप्राईज आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांच्या सह्याद्री फिल्म्स निर्मित, नाडियाडवाला ग्रॅण्डसन एंटरटेनमेंट प्रस्तुत एका मोठ्या चित्रपटाची आज घोषणा करण्यात आली आहे. या शुभदिनी या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली असून या चित्रपटाचे नाव ‘येक नंबर’ असे आहे. ‘व्हेंटिलेटर’, ‘फेरारी की सवारी’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीचे चित्र नव्याने उलगडणार, हे नक्की!
‘येक नंबर’ ही एक प्रेमकथा आहे. जी राजकीय पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे. राजकारण आणि प्रेम यांची गुंफण करून तयार करण्यात आलेले या चित्रपटाचे कथानक इतर चित्रपटांपेक्षा वेगळे असणार आहे. त्यामुळे समजतंय की, नातेसंबंधांच्या गुंतागुंतीवर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा असेल. (Tejaswini Pandit) संगीतप्रेमींना भुरळ घालणाऱ्या अजय-अतुल या प्रशंसनीय जोडीचे संगीत या कथानकात अधिकच भर टाकणार आहे. महाराष्ट्रातील वाई, जुन्नर, मुंबई आणि कोकण यांसारख्या नयनरम्य ठिकाणी ‘येक नंबर’चे ५२ दिवस चित्रीकरण होणार आहे.
(Tejaswini Pandit) तेजस्विनीने वर्धा नाडियाडवाला यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलंय, ‘मित्र-मैत्रिणींनो, आज जागतिक महिला दिनानिमित्त मी आणि माझी सशक्त मैत्रीण, सहकारी निर्माती वर्धा नाडियाडवालाच्या साथीने आजपासून “येक नंबर” कारभार जमवलाय, निर्माती म्हणून आणखी एक मोठी उडी घेतलीये, नेहमीप्रमाणे तुमचे आशिर्वाद आणि प्रेम असू दे ! ह्या आमच्या प्रवासात आम्हाला भक्कम तंत्रज्ञ लाभले आहेत. दिग्दर्शक राजेश मापुस्कर, छायाचित्रकार संजय मेमाने आणि संगीत अजय-अतुल. आमच्या ह्या “येक नंबर” परिवाराला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे! आजपासून “येक नंबर“ च्या चित्रीकरणास सुरुवात.. गणपती बाप्पा मोरया!! आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा!!’