मुंबई । भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी ज्येष्ठ कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मानवतेच्या आधारावर अंतरिम जामिनावर देत असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. वाढतं वय, ढासळती तब्येत याच्या पार्श्वभूमीवर एक कैदी म्हणून त्यांना असलेला अधिकार याचा विचार करता 50 हजारांच्या वैयक्तिक जामिनावर केवळ ६ महिन्यांसाठी सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे त्यांच्या खंडपीठानं राखून ठेवलेला आपला निकाल सोमवारी सकाळी जाहीर केला. 82 वर्षीय राव यांना वैद्यकीय कारणांसाठी हायकोर्टाकडनं हा जामीन मंजूर केला आहे. दरम्यान राव यांना वाटल्यास ते पुन्हा तपासयंत्रणेकडे सरेंडर करू शकतात अथवा ६ महिन्यांनी पुन्हा हायकोर्टात जामिनाचा अवधी वाढवण्यासाठी अर्ज करण्याची हायकोर्टाकडून मुभा देण्यात आली आहे.
याशिवाय राव यांना पासपोर्ट एनआयएकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच विना परवानगी राहत घर सोडण्यास मनाई करत खटल्यातील साक्षीदारांना संपर्क साधण्यासही मनाई करण्यात आली आहे. एनआयएच्यावतीनं एएसजी अनिल सिंह यांनी या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी ३ आठवड्यांची स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र हायकोर्टानं ही मागणी फेटाळून लावली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.