कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सुपने, पश्चिम सुपने येथे टेंभू उपसा जलसिंचन योजनेमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला ताबडतोब मिळावा, या मागणीसाठी कार्यकारी अभियंता आर. वाय. रेड्डीयार, प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, टेंभू उपसा जलसिंचन योजनेंतर्गत सुपने व पश्चिम सुपने येथील कोयना नदीकाठावरील शेतकऱ्यांची जमीन बाधित झाली आहे. त्या जमिनीचा शासकीय मोबदला देण्यासाठी २०११ रोजी शासकीय अधिकाऱ्यांकडून रीतसर मोजणी व बाधित जमिनीचा सर्व्हे झाला आहे. मात्र, दहा वर्षे उलटूनही अद्याप बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. गेल्या वर्षी प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांकडून संमतीपत्रे घेऊन जमीन खरेदीची कारवाई सुरू केली. मात्र, काही जमीनधारक शेतकऱ्यांना कागदोपत्री अडचणी येत असल्याने ही प्रक्रिया ठप्प झाली आहे. परिणामी ज्या शेतकऱ्यांची कागदोपत्री पूर्तता झाली आहे, त्यांनाही नाहक प्रशासकीय अडचणीमुळे त्यांच्या हक्काचे जमीन मोबदल्यापासून वंचित राहावे लागले आहे.
प्रशासनाने ही प्रक्रिया गतीने राबवण्यासाठी ताबडतोब कागदोपत्री त्रुटी दूर करून वंचित शेतकऱ्यांना जमीन मोबदला देण्याची कारवाई करावी. ज्यांची कागदोपत्री पूर्तता पूर्ण झाली आहे, त्यांना प्राधान्याने जमीन मोबदला देण्यासाठी ताबडतोब पावले उचलावीत. अन्यथा टेंभू योजनेच्या प्रशासनाविरुद्ध असहकार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे शेतकरी शिवाजी पाटील, सुहास पाटील, विश्वजित थोरात, अर्जुन कळंबे, दीपक गायकवाड, रामचंद्र गायकवाड, सुरेश गायकवाड, दिलीप थोरात, मंगेश गायकवाड, भगवान गायकवाड, जनार्दन थोरात, हिंमत गायकवाड, सुभाष कोळी, अनिल साळुंखे, नामदेव जाधव, यांच्यासह सुपने पश्चिम सुपनेचे शेतकरी उपस्थित होते.