सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
जिल्ह्यातील टेंभू योजनेच्या पाण्याने ऐन उन्हाळ्यात आटपाडी तालुक्यातील १४ तलाव आणि सात ओढ्यावरील पन्नासवर बंधारे भरले आहेत. याचा दहा ते बारा हजार हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष लाभ झाला आहे. टेंभूमुळे अनेक गावांनी पाणी आणि चाराटंचाईवर मात केली असून तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
आटपाडी तालुक्यात २०१४ मध्ये पहिल्यांदा टेंभूचे पाणी आले. त्यानंतर दरवर्षी कामे होत गेली. वेगवेगळ्या भागांत पाणी जाऊ लागले. चार वर्षांत कामाला अपेक्षित गती मिळाली. बंद पाइपलाइनची कामे सुरू झाली. परिणामी, टेंभूचे पाणी अनेक भागांत जाऊ लागले. त्यामुळे लाभक्षेत्र वाढत चालले. योग्य नियोजन, समन्वय ठेवून प्रशासनाकडून कामे करून घेतली. वेगवेगळ्या प्रयोगातून काही भागांत पहिल्यांदाच पाणी पोचले.
यावर्षी जेमतेम ८० मिलिमीटर पाऊस झाला होता. पेरण्याही नव्हत्या. तलाव कोरडे ठणठणीत. त्यामुळे रब्बी हंगामात सलग ७५ दिवस योजना सुरू ठेवून तालुक्यातील महत्त्वाचे तलाव भरून दिले. अनेक ओढ्यांना पाणी सोडले. त्यामुळे पिके पदरात पडली आणि डाळिंब हंगाम यशस्वी पार पडला. टेंभूचे दुसरे उन्हाळी आवर्तन पाच मार्चला सुरू केले. ११ मार्चला घाणंद तलावात पाण्याने प्रवेश केला. ८० दिवस योजना सुरू आहे. तलाव, बंधारे भरल्याने अनेक गावांच्या पाणी योजना सुरू राहिल्या. पिण्याच्या पाणीटंचाईवर मात करता आली. चारानिर्मितीसाठीही उपयोग झाला. बागा जिवंत राहिल्या. टँकर भरण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आहे.