कराडला काॅटेज हाॅस्पीटलमध्ये महिलेच्या मृत्यूमुळे तणाव, नातेवाईकांची दोषीवर कारवाईची मागणी

0
70
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

प्रसुतीनंतर तिसऱ्याच दिवशी मातेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांसह नागरीकांनी मंगळवारी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात ठिय्या मांडला. डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. या घटनेमुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरेखा अर्जुन माने (वय ३०, रा. वडार वस्ती, कराड) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वडार वस्तीमध्ये राहणाऱ्या सुरेखा माने यांना नातेवाईकांनी गुरूवारी, दि. 19 प्रसुतीसाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी सुरेखा यांचे सिझर झाले. त्यांनी मुलाला जन्म दिला. त्यानंतर दिवसभर त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र, शनिवारी सकाळी डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन दिल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाल्याचे कृष्णा रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांसह नागरीक मंगळवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात जमले.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सुरेखा माने यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी जमावाने केली. यावेळी ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पिसाळ, विभागीय जिल्हाध्यक्ष विजय पवार, उपाध्यक्ष आनंदा सावंत, दशरथ धोत्रे, महेश अलकुंटे, नवनाथ पवार, अनिल चौगुले, श्रीकांत भोसले, अमोल शिंदे, महेश धोत्रे यांच्यासह सुरेखा यांचे नातेवाईक व नागरीक उपस्थित होते. दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जमावाने केली. पोलीस उपअधिक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी जमावाशी चर्चा करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तणाव निवळला.

तीन दिवसांचे मुल पोरके

सुरेखा यांनी जन्म दिलेल्या मुलाची प्रकृती स्थिर असून त्याला नातेवाईकांनी ताब्यात घेतले आहे. सध्या ते मुल नातेवाईकांसोबत घरी आहे. मात्र, तिसºयाच दिवशी ते मुल आईच्या प्रेमाला पोरके झाले असून या मुलासह त्याच्या मोठ्या भावाची पालन पोषणाची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी नातेवाईकांसह ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here