सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा- पंढरपूर महामार्गावर गोंदवले खुर्दजवळ समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तिघे तरुण जागेवरच ठार झाले तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की चक्काचूर झालेली अपघातग्रस्त वाहने सुमारे तीनशे फूट अंतरापर्यंत दूरपर्यंत जाऊन पडली होती. सर्व मृत पळशी आणि दीडवाघवाडी (ता. माण) येथील असल्याने पळशी व दिडवाघवाडी गावावर शोककळा पसरली.
सातारा-पंढरपूर हायवेचे काम पूर्ण होत असताना गोंदवले खुर्द परिसरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास स्विप्ट कार (एमएच – 05 व्ही- 9695) व बुलेट यांचा समोरासमोर अपघात झाला. या धडकेत बुलेटस्वार उंच हवेत फेकले गेले. याच दरम्यान रस्त्याने चाललेल्या क्रूझर (एमएच- 13- एसी- 1749) वर एक जण जाऊन आदळला व त्यानंतर रस्त्यावर फेकला गेल्याने जागेवर मृत झाला. इतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात तुषार लक्ष्मण खाडे (वय- 22), अजित विजयकुमार खाडे (वय- 23), महेंद्र शंकर गौड (वय- 21, सर्व रा.पळशी, ता. माण) हे जागीच ठार झाले.
या अपघातात बुलेटचा अक्षरशः चूरा झाला. स्विफ्ट कारचेही मोठे नुकसान झाले. दोन्हीही वाहने सुमारे 300 फूट अंतरावर दूर फेकली गेल्याने रस्त्यावर वाहनांचे भाग विस्कटून पडले होते. स्विप्ट कार मधील निवृत्त पोलीस आनंदराव ढेंबरे (वय- 62), मुलगा गणेश ढेंबरे (वय- 28) व विहान गणेश ढेंबरे (वय- 5 सर्व रा. दीडवाघवाडी, ता. माण) हे पिंपरी (पुणे) येथून गावी निघाले होते. या अपघातात आनंदराव व गणेश हे गंभीर जखमी झाले. तर या अपघातातून विहान आश्चर्यकारक बचावला. जखमींना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर दहिवडी पोलिस मात्र सुमारे तास उलटूनही घटनास्थळी न आल्याने लोक संतप्त झाले होते. दरम्यान याच परिसरात गेल्या काही महिन्यात झालेला हा सहावा भीषण अपघात आहे. प्रशस्त रस्ता, तीव्र उतार यामुळे याठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे या परिसरात वेग प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
…देव तारी त्याला कोण मारी?
सुदैवाने या झालेल्या भीषण अपघातात तिघेजण जागीच ठार झाले असले तरी सुदैवाने पाच वर्षांच्या मुलाला कोणतीही दुखापत झाली नाही. यावरूनच बघ्यांना देव तारी त्याला कोण मारी? या म्हणीची प्रचिती आली.