हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे जागावाटप अजून अंतिम झालेले नाही, मात्र त्याच दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाकडून लोकसभेची पहिली उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघातून (Mumbai North WesT Lok Sabha) ठाकरेंनी अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) हे शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र आहेत. अशावेळी त्यांनाच लोकसभेच तिकीट ठाकरेंनी दिल्याने महाराष्ट्र्राच्या राजकारणात बाप- लेकामध्ये सामना होताना आपल्याला पाहायला मिळेल.
मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी अमोल यांची उमेदवारी जाहीर केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उमेदवार जाहीर केला असला तरी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा पेच अजूनही सुटला नाही. मात्र जागावाटपात मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघाची जागा ठाकरेंकडेच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ठाकरेंनी थेट अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर करून लोकसभेचे रणशिंग फुंकल आहे.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी ३ ठिकाणी उद्धव ठाकरेंचे आमदार आहेत, तर ३ मतदारसंघात भाजप आमदार आहेत. त्यामुळे दोघांनीही ताकद या मतदारसंघात समान आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये गजानन कीर्तीकर यांनी याठिकाणी विजय मिळवत आपलं निर्विवाद वर्चस्व मिळवले. २०१४ ला त्यांनी काँग्रेसचे गुरुदास कामत आणि २०१९ मध्ये संजय निरुपम यांचा पराभव केला होता. आता हि जागा जर शिंदे गटाने लढवली तर गजानन कीर्तिकर हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाप- लेकामध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळेल.