ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात यावर्षी अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांना लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. दरम्यान आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये राज्यात अतिवृष्टी आणि पूरग्रस्तबाधित शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले.

राज्यातील अतिवृष्टी व पुराणातील नुकसानीच्या मदतीवरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीका केली जात होती. विरोधीपक्षनेते फडणवीस व दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार निशाणा साधत आरोपही करण्यात आले होते. दरम्यान आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज आपण घेतला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

अशा प्रकारे दिली जाणार मदत –
राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी स्वरूपात मदत केली जाणार आहे. त्यामध्ये जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर स्वरूपात देण्यात येणार असून ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.

Leave a Comment