एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा; ठाकरे गटाचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सात टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले असून आता 4 जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. नुकतेच अनेक अनेक वृत्तवाहिन्यांनी आपापले एक्झिट पोल जाहीर करत देशात कोणाची सत्ता येणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत NDA आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र हा एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेडय़ांसारखा आहे. मोदी जात आहेत हाच 4 जूनचा खरा निकाल आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे.

सामना अग्रलेखात काय म्हंटल –

सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण होण्याआधीच टीव्ही वाहिन्यांनी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर केले व तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाची शपथ घेतील हेसुद्धा सांगून टाकले. उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगालसारख्या मोठया राज्यांच्या मतदानासंदर्भात संपूर्ण ‘डाटा’ बाहेर आलेला नाही. त्यामुळे या राज्यांत काय निकाल लागतील, त्याचे भविष्य कोणीच सांगू शकत नाही, पण या सगळया राज्यांतील मतदानाची सारासार माहिती न घेता ‘एक्झिट पोल’वाल्या कॉर्पोरेट कंपन्यांनी बिनधास्त ठोकून दिले की, पुन्हा एकदा मोदीच येत आहेत व भाजपला आणि त्यांच्या आघाडीस 350 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत. भाजपला 350 जागा मिळाव्यात असे कोणते महान कर्तृत्व या लोकांनी गाजवले आहे ? 2014 आणि 2019 पेक्षा मोदींना लोक भरभरून मते देत आहेत व मोदी तिसऱ्यांदा विजयी होत असल्याचे चित्र निर्माण करणे हा फक्त पैशांचा कॉर्पोरेट खेळ आहे. 1 तारखेस प. बंगाल, उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्या. प. बंगालातील 10 जागांसाठी साधारण 59.15 टक्के मतदान झाले. निवडणूक आयोग चार – पाच दिवसांनी या आकडय़ा आणखी पाच-दहा टक्क्यांची भर टाकेल. मग एक्झिट पोलवाल्यांनी प. बंगालमधील निकाल कोणत्या आधारावर लावले? हरयाणात एकूण 10 लोकसभेच्या जागा आहेत. आता गोंधळ समजून घ्या. 10 लोकसभा जागा असताना तेथे भाजपप्रणीत एनडीएला 16 ते 19 जागा मिळतील असे ‘झी न्यूज’च्या एक्झिट पोलमध्ये दाखवले. हिमाचल प्रदेशात फक्त चार जागा असताना या राज्यात एनडीए सहा ते आठ जागा जिंकेल असा निकाल दिला आहे. बिहारमध्येदेखील लोक जनशक्ती पार्टी प्रत्यक्षात पाच जागांवर लढलेली असताना एक्झिट पोलमध्ये तो पक्ष सहा जागा जिंकू शकेल.

झारखंडमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकच जागा लढवत असताना त्या पक्षाला तीन ठिकाणी विजय मिळेल, असा ‘चमत्कार’ एक्झिट पोलवाल्यांनी केला आहे. हा सर्व आकड्यांचा बनावट खेळ आहे. देशातल्या जनतेचा मूड आणि हे एक्झिट पोल अजिबात मेळ खात नाहीत. ज्या प्रकारचे आकडे समोर आणले तो सर्व सरकारी दबाव तंत्र व भाजपने फेकलेल्या पैशांचा खेळ आहे, पण पैशांच्या हव्यासापायी या ‘पोल’ कंपन्यांनी स्वतःचीच बेअबू करून घेतली. काँग्रेसने तामीळनाडूत फक्त 9 जागांवर निवडणुका लढवल्या, पण ‘आज तक’च्या एक्झिट पोलने तामीळनाडूत काँग्रेसला 13-15 जागा मिळतील अशी भविष्यवाणी केली. हे सर्व आकडे पाहिले तर एक्झिट पोलवाल्यांनी भाजपला 350 या जागा कमीच दिल्या. लोकसभा 543 जागांची असली तरी भाजपला साधारण 800 ते 900 जागा मिळायला काहीच हरकत नव्हती. दिल्लीत काँग्रेस व आप यांच्यातील युती फलदायी ठरत आहे, पण दिल्लीतील सर्वच्या सर्व 7 जागा भाजपला मिळतील असे अंदाजी निकाल एक्झिट पोलवाल्यांनी जाहीर करून टाकले. सत्य असे आहे की, भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षांत प्रत्येक निवडणूक ही बनवाबनवी करून जिंकली. त्यात या एक्झिट पोलचाही वाटा आहे. या वेळी एक्झिट पोलचे आकडे व 4 जूनचे प्रत्यक्ष निकाल यात जमीन अस्मानाचा फरक राहील याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही.

भाजपच्या हाती सत्तेची सूत्रे गेल्यापासून हवे ते आकडे आणि निकाल सरळ विकत घेतले जातात. हे त्यांचे धोरण ठरलेलेच आहे. अमित शहा यांनी गेल्या 48 तासांत देशातील दीडशेच्या वर जिल्हाधिकाऱ्यांना व डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटना फोन करून ‘दम’ भरल्याची माहिती समोर आली. मतगणनेत भाजपला मदत करा, विरोधकांनी आक्षेप घेतले तर लक्ष देऊ नका असे म्हणे अमित शहांनी अनेक जिल्हाधिकाऱ्यांना धमकावले. हे सत्य असेल तर निवडणूक आयोग हासुद्धा एक कठपुतली बनून फक्त तमाशाच पाहत आहे असेच म्हणावे लागेल. मोदी ध्यानाला बसले तसा आपला निवडणूक आयोगही डोळे मिटून बगळ्याप्रमाणे ध्यानाला बसला आहे. अर्थात, लोकशाहीत जनता सर्वोपरी व मतदार हाच राजा आहे. 4 जूनला मतमोजणी होईल व हुकूमशाहीचा अंधकार दूर होईल. मोदींनी ध्यान केले व सूर्याला शांत केले असे भाजपवाले सांगतात. मोदी यांनी ध्यान केले तरी जनतेच्या मनात उसळलेला उद्रेक ते शांत करू शकलेले नाहीत व त्यामुळे भाजपचा पराभव होणारच आहे. भाजप 225 जागांच्या पुढे जात नाही व इंडिया आघाडी 295 ते 310 जागा जिंकून सरकार स्थापन करेल. एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेडय़ांसारखा आहे. त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही. मोदी है तो इंडिया आघाडीचा विजय शंभर टक्के मुमकीन है! मोदी जात आहेत हाच 4 जूनचा खरा निकाल आहे असं सामनातून म्हंटल आहे.