हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने २३ जुलै रोजी अर्थसंकल्प मांडला. यावेळी सरकारकडून देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि शेतकरी वर्गाला खुश करण्यासाठी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र महाराष्ट्रासाठी विशेष असं काहीही केंद्राने दिले नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचे नावही अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात घेतलं नाही. यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांचे हे दावे खोडून काढत आकडेवारीचा संदर्भ दिला. परंतु आता याच आकडेवारीवरुन ठाकरे गटाने संताप व्यक्त करत थेट ‘देवेंद्रभौ, तुमची आकडेमोड चुलीत घाला’ असं म्हटलं आहे. सामना अग्रलेखातून फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?
निर्मलाताई ‘बजेट’ पेश करीत असताना महाराष्ट्रात देवेंद्रभौ फडणवीस हे हाती कागद-पेन्सिल घेऊन टिपणे काढीत होते (तसा फोटू प्रसिद्ध झाला आहे) व सर्व संपल्यावर ‘महाराष्ट्रावर अन्याय झाला नाही हो’ अशी बोंब त्यांनी ठोकली. त्यांच्या बोंबाबोंबीत मग इतरांनीही सहभाग घेतला. महाराष्ट्रावर धडधडीत अन्याय झाला असताना गुजरात व्यापारी मंडळाची ‘री’ ओढणारे देवेंद्रभौंचे महामंडळ म्हणजे आश्चर्यच आहे. महाराष्ट्राशी बेइमानी होत असताना त्या बेइमानीचे समर्थन करणे हा काही महाराष्ट्रधर्म नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या अन्नदात्या शेतकयांसाठी काय दान मिळाले? केंद्रातले सरकार वाचवले, पण शेतकऱ्यांचे प्राण वाचवायला गुजरात व्यापारी मंडळ तयार नाही.
आंध्र, बिहारमधील लाखो कोटी रुपयांची कामे व ठेकेदारी, त्यातील कमिशन शेवटी गुजरातकडेच वळणार आहे व हे सर्व ओरपून झाल्यावर महाराष्ट्रात येऊन अमित शहा भ्रष्टाचार व नैतिकतेवर प्रवचन झोडणार आहेत. केंद्राला सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राला काय मिळाले हे सांगायला कोणी तयार नाही. महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट आहे. निधी वाटपावरून अजित पवार व देवेंद्रभींचे ‘लाडके भाऊ’ गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाली. ‘आता पैसा जमा करण्यासाठी जमिनी विकू काय?’ असा त्रागा अर्थमंत्री अजित पवारांनी केला, पण उपमुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय बजेटची आकडेमोड करीत बसले आहेत. निर्मलाताईंनी महाराष्ट्राच्या तोंडाला साफ पाने पुसली तरी गुजरातचे लवंग, इलायची, कतरी सुपारीचे पान चघळत ते पिचकाऱ्या मारीत आहेत. महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले? कोणते उद्योग, कोणते प्रकल्प, कोणता निधी आला? शे-दोनशे कोटींचे चणे-फुटाणे फेकले असतील व त्यामुळे महाराष्ट्रातील चमच्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर त्यांनी खुशाल त्यांचा शिमगा साजरा करावा.
महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र खेचून गुजरातला नेले, महाराष्ट्राच्या जमिनी बुलेट ट्रेनच्या नावाखाली घेतल्या, उद्योग पळवले व त्या बदल्यात मराठी माणसाला काय दिले, तर एक दिल्लीचे पायपुसणे म्हणून काम करणारे टुकार – भिकार सरकार ! महाराष्ट्र हा देशाला सदैव देणारा आहे. महाराष्ट्र हा दाता आहे. निसर्गाने महाराष्ट्राची जडणघडण त्यासाठीच केली, पण गुजरात व्यापार मंडळाने महाराष्ट्राचे हे दात्याचे स्थान नष्ट करण्याचा अफझलखानी विडाच उचलला आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दाहोद येथे झाला. त्या मातीचा गुण-वाण सध्याच्या गुजरात व्यापार मंडळास लागला आहे व त्या गुणधर्मास जागून महाराष्ट्राची लूट सुरू केली आहे.
गुजरातच्या व्यापार मंडळाने स्वातंत्र्यपूर्व काळात ईस्ट इंडिया कंपनीस खंडणी देऊन आपले व्यापार-उद्योग वाचवले. आज तशाच खंडण्या देऊन दिल्लीतील डळमळीत खुर्च्या वाचवल्या जात आहेत. या खंडणीच्या खेळात देशाला काय मिळाले? महाराष्ट्राला काय मिळाले? जनतेने गुजरात व्यापार मंडळाचे बहुमत काढून घेतले, पण त्याची ना खंत ना खेद! सत्ता टिकविण्यासाठी देशाच्या अर्थसंकल्पाचा वापर करणारे नादान व्यापारी मंडळ म्हणून यांचा उल्लेख इतिहासात होईल. लोकसभा निकालाने पीडित बजेट पेश करून व्यापार मंडळाने आपण ईस्ट इंडिया कंपनीचे वारसदार असल्याचे सिद्ध केले. देवेंद्रभौ, तुमची आकडेमोड चुलीत घाला! असं म्हणत ठाकरे गटाने फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे.